प्रभाग क्रमांक ४ मधील रस्ते व वीज पोलच्या प्रश्नांवर AIMIM आक्रमक; नगर परिषदेला निवेदने .
औसा, प्रतिनिधी :
मुख्तार मणियार
औसा शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)च्या वतीने औसा नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांना दोन स्वतंत्र निवेदने सादर करण्यात आली.
पहिल्या निवेदनात हाशमी नगर परिसरातील इंजीनियर अजिमुल्ला पटेल यांच्या घरापासून हाजी शब्बीर सय्यद गुंडेवार यांच्या घरापर्यंतच्या मार्गावर वीज पोल नसल्याची गंभीर समस्या मांडण्यात आली आहे. परिसरात नव्याने वस्ती वाढल्याने अनेक नागरिकांना वीज जोडणी मिळविण्यास अडचणी येत असून, काही ठिकाणी तात्पुरत्या तारांद्वारे वीजपुरवठा घेतला जात आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, वीज पोल नसल्याने स्ट्रीट लाईटची सुविधाही उपलब्ध नाही. परिणामी, रात्रीच्या वेळी नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मार्गावर तातडीने नवीन वीज पोल उभारण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुसऱ्या निवेदनात प्रभाग क्रमांक ४ मधील करीम नगर व कादरी नगर परिसरातील अपूर्ण रस्त्यांच्या कामाकडे लक्ष वेधण्यात आले आहे. दादू पटाणे यांच्या घरापासून शाबुद्दीन शेख यांच्या घरापर्यंत तसेच महेताब शेख (सर) यांच्या घरापासून मुस्तफा तांबोळी यांच्या घरापर्यंतचा रस्ता अद्याप पूर्ण झालेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पावसाळ्यामुळे या मार्गांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, नागरिकांना पायी चालणे तसेच वाहनांची ये-जा करणे अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे संबंधित रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करून आवश्यक ठिकाणी मुरूम टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.
ही दोन्ही निवेदने AIMIMचे तालुकाध्यक्ष ॲड. गफरुल्ला हाश्मी, शहराध्यक्ष सय्यद कलीम, सय्यद जमीरोद्दीन, शकील देशमुख, गफूर पठाण, सय्यद मुजीबोद्दीन, पटेल मकसूद, समद देशमुख आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने औसा नगर परिषद प्रशासनाकडे सादर करण्यात आली. नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत तातडीने कार्यवाही करून प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

0 टिप्पण्या