शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी २४ ऑगस्टला लामजना येथे रास्ता रोको
सरकारला जाब विचारण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक; मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
औसा प्रतिनिधी मुख्तार मणियार
औसा : नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत देऊन बोळवण करण्याच्या सरकारच्या भूमिकेविरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता लामजना पाटी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन औसा तहसीलदारांना देण्यात आले आहे.
निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकारने हे आश्वासन पूर्ण केले नसल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडण्यात आल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
पीकविमा, सरसकट कर्जमाफी आणि उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला भाव या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत. तसेच पूर्वीची एक रुपयातील चार ट्रिगर असलेली पीकविमा योजना बंद केल्याबद्दलही शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट कायम असताना सरकारकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. गतवर्षी अतिवृष्टीच्या काळात मुख्यमंत्री यांनी १७ हजार ५०० रुपये पीकविमा देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळाला नसल्याचा दावा संघटनेने केला आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या घरांसमोर आंदोलन करण्यात आले. मात्र, त्यानंतरही लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाठ फिरवल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
त्यामुळे २४ ऑगस्ट रोजी खांद्यावर चाबूक आणि हातात रुमणे घेऊन असंख्य शेतकरी लामजना पाटी येथे एकत्र येऊन सरकारविरोधात आक्रोश व्यक्त करणार असल्याचे शेतकरी संघटनेने जाहीर केले आहे. या रास्ता रोको आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या निवेदनावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, तसेच राजेंद्र मोरे, रुपेश शंके, बालाजी जाधव, सतीश सोळंके, शिवाजी पाटील, शाहूराज कांबळे, दत्ता भांगे, कल्याणप्पा हुरदळे, दीपक कांदगुळे, विवेक पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


0 टिप्पण्या