औसा शहरात कचऱ्याचे साम्राज्य; स्वच्छता ठप्प

 औसा शहरात कचऱ्याचे साम्राज्य; स्वच्छता ठप्प







स्वच्छतेचे टेंडर संपल्याने १० ऑगस्टपासून काम बंद; एमआयएमकडून नगर परिषदेला निवेदन, कारवाई न झाल्यास ‘टाळे ठोको’ आंदोलनाचा इशारा


औसा प्रतिनिधी 


औसा : औसा नगर परिषद अंतर्गत शहरातील स्वच्छतेचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका संपल्याने १० ऑगस्टपासून स्वच्छता व्यवस्था ठप्प झाली आहे. परिणामी शहरातील विविध भागांत कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यूसारख्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


या गंभीर प्रश्नाकडे नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एमआयएमचे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांनी मुख्याधिकारी, औसा नगर परिषद यांना निवेदन दिले आहे.


निवेदनात म्हटले आहे की, औसा शहरातील स्वच्छतेचे काम ठेकेदार पद्धतीने सुरू होते. मात्र ठेका संपल्यानंतर १० ऑगस्टपासून काम बंद आहे. मागील काही दिवसांपासून कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांनाही काम करण्यास अडथळा आणला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच घंटागाडी व इतर स्वच्छता वाहनेही बाहेर काढू दिली जात नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.


शहरातील मुख्य चौकांसह दुकानांसमोर मागील तीन दिवसांपासून कचऱ्याचे ढीग पडून आहेत. औसा शहराची लोकसंख्या सुमारे ४० हजार असून, एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.


नगर परिषद प्रशासनाने तातडीने शहरातील स्वच्छता करून घ्यावी, घंटागाडी वाहने सुरू करावीत तसेच शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर चर्चा करून तोडगा काढावा. चर्चा निष्फळ ठरल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी एमआयएमच्या वतीने करण्यात आली आहे.


प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल न घेतल्यास औसा नगर परिषद कार्यालयावर ‘टाळे ठोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.


निवेदनाची प्रत जिल्हा सहआयुक्त, नगर परिषद प्रशासन लातूर तसेच औसा पोलीस निरीक्षक यांना माहितीस्तव देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या