कथित आक्षेपार्ह वक्तव्यांची निष्पक्ष चौकशी करा दक्कन टायगर संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी



 कथित आक्षेपार्ह वक्तव्यांची निष्पक्ष चौकशी करा


दक्कन टायगर संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी



लातूर : मुस्लिम समाज व मुस्लिम मतदारांविषयी कथित आक्षेपार्ह, अपमानास्पद तसेच हिंसक स्वरूपाची वक्तव्ये केल्याप्रकरणी संबंधित भाषणे, ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग व उपलब्ध सामग्रीची निष्पक्ष तांत्रिक चौकशी करून कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी दक्कन टायगर संघटना, महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष सय्यद सलीम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


संघटनेच्या निवेदनानुसार, आमदार संग्राम जगताप, शिवाजी कर्डिले तसेच संग्राम भांडे-पुजारी यांच्या संदर्भातील कथित वक्तव्यांमध्ये मुस्लिम मतदारांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच मुस्लिम समाजाबद्दल अपमानास्पद शब्दप्रयोग आणि हिंसक स्वरूपाची भाषा वापरल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


या वक्तव्यांची सत्यता तपासण्यासाठी संबंधित भाषणांचे मूळ ऑडिओ-व्हिडिओ फुटेज मिळवून त्याची तांत्रिक तपासणी करावी. वक्तव्यांचा संपूर्ण संदर्भ तपासून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि दोष आढळल्यास संबंधितांवर प्रचलित कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.


“सामाजिक सलोखा, कायद्याचे राज्य आणि सर्व नागरिकांच्या सन्मानाचे संरक्षण होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी,” अशी भूमिका दक्कन टायगर संघटनेने मांडली आहे.


या निवेदनावर दक्कन टायगर संघटना, महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष सय्यद सलीम यांची स्वाक्षरी असून, निवेदन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, लातूर यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या