औसा नगर पालिकेच्या भोंगळ कारभारा विरोधात भाजप आक्रमक!
कचरा, पथदिवे अन् दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त; भाजपचा तीव्र आंदोलनाचा इशारा
नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना भाजप शिष्टमंडळाचे निवेदन
२५ ऑगस्टपर्यंत समस्या न सुटल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा भाजप शहरमंडळाचा इशारा
औसा प्रतिनिधी
गेल्या १५ दिवसांपासून औसा शहरात घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन न झाल्यामुळे शहराला बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. ठिकठिकाणी बंद असलेले पथदिवे आणि नळाद्वारे होणारा अस्वच्छ, अनियमित पाणीपुरवठा यामुळे औसा वासीय कमालीचे त्रस्त झाले आहेत. नगर परिषदेच्या या भोंगळ कारभाराविरोधात भारतीय जनता पार्टी औसा शहर मंडळाच्या वतीने प्रशासनाला खरमरीत निवेदन देण्यात आले असून, येत्या २५ ऑगस्ट २०२६ पर्यंत समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
भाजप शहर मंडळ अध्यक्ष प्रा. शिवरुद्र महादेवप्पा मुरगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने औसा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना हे निवेदन सादर केले असून या निवेदनात असे नमूद केले आहे, शहरात गेल्या पंधरवड्यापासून कचरा उचलण्यात आलेला नाही, ज्यामुळे जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होऊन आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच रात्रीच्या वेळी मुख्य रस्ते व गल्लीबोळात पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यातच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अस्वच्छ व अनियमित होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे चित्र आहे.
तरी प्रशासनाने तातडीने या नागरी समस्यांकडे लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात आणि जनतेला त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. २५ ऑगस्ट २०२६ पर्यंत यावर योग्य ती कार्यवाही न झाल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने औसा नगर परिषदेवर धडक देऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा गटनेते तथा विरोधी पक्षनेते सुनीलप्पा मिटकरी यांनी यावेळी दिला आहे.
याप्रसंगी भाजप शहर अध्यक्ष प्रा. शिवरुद्र मुरगे, गटनेते तथा विरोधी पक्षनेते सुनील सिद्रामप्पा मिटकरी, नगरसेवक आकाश शिवशंकर उटगे, नगरसेवक पियुष गोपाळराव म्हेत्रे, भाजप जिल्हा लातूर ग्रामीण सचिव विशाल बालाजी फुटाणे, अक्रम खान पठाण,गणेश शिवशंकर माळी, मिनाहाज पटेल, उमर पंजेशा, अल्ताफ करपुडे, कल्पना ताई डांगे,प्रियंका लद्दे, रियाज पटेल, पवन कांबळे, जयराज कारंजे, शिल्पा कुलकर्णी, यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





0 टिप्पण्या