दुष्काळग्रस्त शेतकरी, महिला बचत गटांच्या कर्जवसुलीला जून २०२७ पर्यंत स्थगिती द्या....
विविध वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जासाठी तातडीने दिलासा देण्याची शेख मुजम्मील महंमद यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी...
औसा प्रतिनिधी : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, महिला बचत गट व शेतकरी बचत गटांना आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी विविध वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीला जून २०२७ पर्यंत स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी शेख मुजम्मील महंमद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दि. २८ सप्टेंबर रोजी तहसीलदार, तहसील कार्यालय औसा यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना हे निवेदन सादर करण्यात आले. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेती व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून, पिकांचे नुकसान, उत्पन्नात घट आणि ग्रामीण अर्थव्यवस्थे वरील परिणामामुळे शेतकरी व महिला बचत गट आर्थिक अडचणीत सापडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सरकारी व सहकारी बँका तसेच मायक्रो फायनान्स संस्थांना सूचना देण्याची मागणी..
दुष्काळग्रस्त परिस्थितीचा विचार करून सरकारी बँका, सहकारी बँका तसेच मायक्रो फायनान्स संस्थांकडून महिला बचत गट, शेतकरी बचत गट आणि शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाच्या वसुलीला जून २०२७ पर्यंत स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच आर्थिक अडचणीत आलेल्या कर्जदारांना पुनर्गठन, मुदतवाढ व उपलब्ध शासकीय सवलतींचा लाभ देण्यात यावा. दुष्काळग्रस्त शेतकरी व बचत गटांवर कोणत्याही प्रकारच्या अनावश्यक वसुलीचा दबाव आणू नये, याबाबत संबंधित वित्तीय संस्थांना योग्य निर्देश द्यावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनात
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे - महिला बचत गट, शेतकरी बचत गट व शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला जून २०२७ पर्यंत स्थगिती द्यावी, सरकारी व सहकारी बँका तसेच मायक्रो फायनान्स संस्थांना आवश्यक सूचना द्याव्यात,
आर्थिक अडचणीत असलेल्या कर्जदारांना कर्ज पुनर्गठन व मुदतवाढ द्यावी, उपलब्ध शासकीय सवलतींचा लाभ कर्जदारांना मिळवून द्यावा,
दुष्काळग्रस्त शेतकरी व बचत गटांवर अनावश्यक वसुलीचा दबाव आणू नये,
दुष्काळग्रस्त कर्जदारांना आवश्यक आर्थिक दिलासा द्यावा. “दुष्काळग्रस्त शेतकरी व महिला बचत गटांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,” अशी विनंती निवेदनातून करण्यात आली व निवेदनावर जमादार अनिल, एस ए काझी, न्यामत लोहारे, महेबुब मणियार हजर होते.

0 टिप्पण्या