मराठवाड्यातील बायपास लोहमार्गांचे भीजत घोंगडे कायम?
बायपास लोहमार्गांअभावी प्रवाशांचा वेळ वाया; नव्या रेल्वेगाड्यांच्या मार्गातही अडथळे
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना आजही अनेक जंक्शन स्थानकांवर इंजिन बदलण्याच्या प्रक्रियेमुळे अनावश्यक विलंबाचा सामना करावा लागत आहे. परळी वैजनाथ, लातूर रोड, पूर्णा, परभणी तसेच अंकाई (मनमाड) या महत्त्वाच्या रेल्वे जंक्शनवर अनेक गाड्यांना दिशा बदलावी लागते. त्यामुळे इंजिन एका टोकावरून दुसऱ्या टोकाला हलविण्याची प्रक्रिया करावी लागते आणि गाड्या ३० ते ६० मिनिटांपर्यंत स्थानकांवर थांबून राहतात. परिणामी प्रवाशांचा वेळ वाया जातो, रेल्वेच्या इंधनाचा अतिरिक्त खर्च होतो आणि संपूर्ण रेल्वे व्यवस्थेवर ताण निर्माण होतो.
रेल्वे तज्ज्ञांच्या मते, मराठवाड्यातील प्रस्तावित बायपास लोहमार्गांची उभारणी पूर्ण झाल्यास अनेक गाड्यांच्या प्रवासाच्या वेळेत दीड ते दोन तासांची बचत होऊ शकते. तसेच दक्षिण-उत्तर आणि पूर्व-पश्चिम दिशांना धावणाऱ्या नव्या रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठीही मोठी मदत होणार आहे.
२०१६ मध्ये मंजुरी; मात्र कामांची संथ गती
माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २०१६ मध्ये दक्षिण मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील गुट्टी, रेणीगुंटा, विजयवाडा, काझीपेट, पेद्दापल्ली आणि मोटीमारी येथील बायपास लोहमार्गांच्या सर्वेक्षणासह मराठवाड्यातील अंकाई (मनमाड), परळी वैजनाथ, लातूर रोड, परभणी आणि पूर्णा येथील बायपास प्रकल्पांनाही मंजुरी दिली होती.
यानंतर दक्षिण मध्य रेल्वेने सर्वेक्षण पूर्ण केले. मात्र आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील गुट्टी, पेद्दापल्ली आणि मोटीमारी येथील बायपास लोहमार्ग पूर्ण करण्यात आले, तर काझीपेट, विजयवाडा आणि रेणीगुंटा येथील प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. दुसरीकडे मराठवाड्यातील बायपास प्रकल्पांकडे अनेक वर्षे दुर्लक्ष झाल्याची भावना रेल्वे प्रवाशांमध्ये आहे.
परळी वैजनाथ, लातूर रोड आणि अंकाई येथे हालचाली
दक्षिण मध्य रेल्वेने अंकाई, परळी वैजनाथ आणि लातूर रोड येथील बायपास मार्गांसाठी आवश्यक जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण केली असून काही ठिकाणी प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे.
लातूर रोड येथे बायपास लोहमार्गासह स्वतंत्र बायपास रेल्वे स्थानक उभारण्यात येणार आहे.
परळी वैजनाथ येथे सुमारे १.९ किलोमीटर लांबीचा बायपास लोहमार्ग आणि नवीन रेल्वे स्थानक उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.
अंकाई (मनमाड) येथे सुमारे २.२१ किलोमीटर लांबीच्या बायपास मार्गासाठी जमीन अधिग्रहण पूर्ण झाले असले, तरी प्रत्यक्ष कामाची गती अद्याप समाधानकारक नाही.
परभणी आणि पूर्णा येथील बायपास प्रकल्प मात्र अद्याप कागदोपत्रीच असल्याचे चित्र आहे.
बायपास लोहमार्गांचे फायदे
मराठवाड्यातील सर्व प्रस्तावित बायपास लोहमार्ग पूर्ण झाल्यास रेल्वे वाहतुकीत मोठा बदल घडू शकतो.
अंकाई बायपास पूर्ण झाल्यानंतर मनमाड जंक्शनवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल.
पुणे आणि शिर्डीकडे जाणाऱ्या गाड्यांचे अंतर सुमारे २८ किलोमीटरने कमी होऊन प्रवासाचा वेळ जवळपास दीड तासांनी घटेल.
परळी वैजनाथ आणि लातूर रोड बायपासमुळे पुणे, सोलापूर, पंढरपूर आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्यांच्या प्रवासाच्या वेळेत जवळपास दोन तासांची बचत होऊ शकते.
परळी वैजनाथ आणि लातूर रोड येथे नवीन रेल्वे स्थानके उभारल्यामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
नागपूर, जबलपूर, वाराणसी, रायपूर, धनबाद, कोल्हापूर, बेळगाव, मडगाव आणि सोलापूर या भागांना जोडणाऱ्या नव्या रेल्वेगाड्या सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल.
परळी वैजनाथ – लातूर रोड विभागात अतिरिक्त ब्लॉक स्टेशन्सची गरज
मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या दृष्टीने परळी वैजनाथ – लातूर रोड हा विभाग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सुमारे ६३ किलोमीटर लांबीचा हा विभाग आजही एकेरी (सिंगल लाईन) लोहमार्गावर कार्यरत आहे. परळी वैजनाथ हे महत्त्वाचे जंक्शन असून येथून परभणी, पूर्णा, नांदेड, विकाराबाद, हैदराबाद तसेच पुणे दिशेने रेल्वे वाहतूक चालते. दुसरीकडे लातूर रोड रेल्वे स्थानक हे लातूर शहरापासून सुमारे ३३ किलोमीटर अंतरावर असून संपूर्ण लातूर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार आहे.
ब्लॉक स्टेशन म्हणजे काय?
रेल्वे मार्गावरील दोन नियंत्रित स्थानकांमधील सुरक्षित विभागाला "ब्लॉक सेक्शन" म्हणतात. एका वेळी एका ब्लॉक सेक्शनमध्ये केवळ एकाच गाडीला प्रवेश दिला जातो. त्यामुळे ब्लॉक सेक्शनची संख्या कमी असल्यास गाड्यांना सिग्नलची प्रतीक्षा करावी लागते आणि रेल्वे वाहतुकीचा वेग मंदावतो.
परळी वैजनाथ – लातूर रोड विभागात काही स्थानकांमधील अंतर तुलनेने जास्त असल्यामुळे गाड्यांच्या क्रॉसिंगसाठी मर्यादा निर्माण होतात. एखाद्या गाडीला विलंब झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण विभागातील इतर गाड्यांवर होतो.
अतिरिक्त ब्लॉक स्टेशन्स का आवश्यक?
रेल्वे तज्ज्ञांच्या मते, या एकेरी विभागात नवीन ब्लॉक स्टेशन्स आणि क्रॉसिंग पॉइंट्स उभारणे अत्यावश्यक आहे.
यामागील प्रमुख कारणे अशी आहेत :
संपूर्ण विभाग एकेरी मार्गावर असल्यामुळे गाड्यांची क्रॉसिंग ठराविक स्थानकांवरच करावी लागते.
नांदेड – पनवेल एक्स्प्रेस, पूर्णा – हैदराबाद एक्स्प्रेस, नांदेड – बेंगळुरू एक्स्प्रेस, नागपूर – कोल्हापूर एक्स्प्रेस, धनबाद – कोल्हापूर एक्स्प्रेस, अमरावती – पुणे एक्स्प्रेस, छत्रपती संभाजीनगर – तिरुपती एक्स्प्रेस यांसह अनेक प्रवासी गाड्या या मार्गाचा वापर करतात.
विविध मालवाहतूक गाड्यांची संख्याही सातत्याने वाढत आहे.
अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ नवीन रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर परळी जंक्शनवरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
परळी वैजनाथ आणि लातूर रोड बायपास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मार्गाची क्षमता वाढविण्यासाठी अतिरिक्त ब्लॉक स्टेशन्स आवश्यक ठरणार आहेत.
मर्यादित ब्लॉक सेक्शन्समुळे अनेकदा गाड्यांना स्टेशनबाहेर किंवा लूप लाईनवर प्रतीक्षा करावी लागते.
अतिरिक्त ब्लॉक स्टेशन्सचे फायदे
गाड्यांच्या क्रॉसिंगसाठी लागणारा वेळ कमी होईल.
सिग्नलवरील प्रतीक्षा कालावधी घटेल.
एक्स्प्रेस गाड्यांचे वेळपालन सुधारेल.
मालवाहतुकीची क्षमता वाढेल.
नवीन रेल्वेगाड्या सुरू करणे सुलभ होईल.
भविष्यातील दुहेरीकरण प्रकल्पासाठी भक्कम पायाभूत सुविधा तयार होतील.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे संपर्क अधिक सक्षम बनेल.
लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज
मराठवाड्यातील रेल्वे विकासाचा वेग वाढविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, रेल्वे सल्लागार समित्या
आणि प्रवासी संघटनांनी बायपास लोहमार्ग, अतिरिक्त ब्लॉक स्टेशन्स, नवीन क्रॉसिंग स्थानके आणि वहनक्षमता वाढविणाऱ्या प्रकल्पांचा सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
आगामी काळात मराठवाड्यात रेल्वे प्रवाशांची संख्या आणि रेल्वेगाड्यांची वाहतूक वाढणार हे निश्चित आहे. त्यामुळे बायपास लोहमार्ग, अतिरिक्त ब्लॉक स्टेशन्स आणि आधुनिक सिग्नलिंग व्यवस्था यांसारख्या पायाभूत सुविधांची कामे तातडीने पूर्ण करणे ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा मराठवाड्याच्या रेल्वे विकासाचे हे महत्त्वाचे प्रकल्प पुढील अनेक वर्षे "भीजत घोंगडे"च राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

0 टिप्पण्या