औसा नगर परिषदेत जनगणना २०२७ प्रशिक्षण भव्यदिव्यरीत्या संपन्न; ७३ प्रगणक-पर्यवेक्षक सज्ज



 📰 औसा नगर परिषदेत जनगणना २०२७ प्रशिक्षण भव्यदिव्यरीत्या संपन्न; ७३ प्रगणक-पर्यवेक्षक सज्ज




औसा : देशाच्या विकासाचा पाया ठरणाऱ्या जनगणना २०२७ मोहिमेच्या तयारीसाठी औसा नगर परिषद (जनगणना शाखा) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सत्र दिनांक ८ मे २०२६ रोजी उत्साहपूर्ण व भव्य वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाले.


२ मे ते ८ मे २०२६ या कालावधीत नगर परिषद औसा कार्यालयाच्या सभागृहात (दुसरा मजला) दररोज सकाळी ९.३० ते सायं. ५.३० या वेळेत हे प्रशिक्षण पार पडले. उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि सक्रिय सहभाग यामुळे हे प्रशिक्षण विशेष ठरले. पहिल्या टप्प्यात (२ ते ५ मे) ३८ जणांचे, तर दुसऱ्या टप्प्यात (६ ते ८ मे) ३५ जणांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन एकूण ७३ प्रगणक व पर्यवेक्षक पूर्णतः प्रशिक्षित व कार्यासाठी सज्ज झाले.


या प्रशिक्षणामध्ये जनगणनेतील तांत्रिक बाबी, अचूक व विश्वसनीय माहिती संकलनाची वैज्ञानिक पद्धत, डिजिटल साधनांचा वापर तसेच प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाची तयारी यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षक म्हणून श्री. अवधूत डोके व श्री. विवेकानंद मुर्के (सहाय्यक शिक्षक) यांनी आपल्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनातून प्रशिक्षणार्थ्यांना प्रेरित व सक्षम केले.


या प्रसंगी औसा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा जनगणना चार्ज अधिकारी यांनी उपस्थितांना संबोधित करत “Self Enumeration (स्व-गणना)” या संकल्पनेचा व्यापक प्रसार करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी SE.CENSUS.GOV.IN या पोर्टलच्या माध्यमातून स्व-गणना करून प्रशासनास सक्रिय सहकार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.


या उपक्रमात नगर परिषद औसा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. मुख्याधिकारी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली श्री. मंगेश शिंदे, सहाय्यक नगर रचनाकार श्री. संदीप जाधव तसेच उपविभागीय अधिकारी श्री. अविनाश कोरडे यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे संपूर्ण प्रशिक्षण उपक्रम यशस्वीपणे पार पडला.


जनगणना ही केवळ सांख्यिकी प्रक्रिया नसून देशाच्या सर्वांगीण विकासाचा मार्गदर्शक आराखडा ठरते. त्यामुळे प्रत्येक प्रगणक व पर्यवेक्षकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे, अचूकतेने व निष्ठेने पार पाडावी, असा ठाम संदेश या प्रशिक्षणातून देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या