औसा येथील श्री मुक्तेश्वर माध्यमिक विद्यालयाचा दहावी निकाल 95.40 टक्के; 18 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण




 औसा येथील श्री मुक्तेश्वर माध्यमिक विद्यालयाचा दहावी निकाल 95.40 टक्के; 18 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण

 अदिती सगरे 98.60 शाळेत पहिली


.....  

औसा (प्रतिनिधी) :- शहरातील श्री मुक्तेश्वर माध्यमिक विद्यालयाने यंदाच्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार विद्यालयाचा एकूण निकाल 95.40 टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.

या वर्षी दहावी बोर्ड परीक्षेसाठी एकूण 283 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी बहुसंख्य विद्यार्थी यशस्वी झाले असून 18 विद्यार्थ्यांनी 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत विशेष यश मिळवले आहे. तसेच 39 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून शाळेचा गौरव वाढवला आहे. एकूण 128 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण निकालामध्ये अदिती अजय सगरे हिने 98.60 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अक्षता नागनाथ पाटील हिने 98.40 टक्के गुणांसह द्वितीय स्थान मिळवले, तर श्रद्धा विजयकुमार बिराजदार हिने 98 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

विद्यार्थ्यांच्या यशामागे शाळेने घेतलेल्या जादा तासिका, नियमित सराव परीक्षा आणि शिक्षकांचे वैयक्तिक मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. शिक्षक रमेश वर्मा, शरणाप्पा जलसकरे, दीपक क्षीरसागर, संदीप कुठे, श्रीमती उज्वला बनकर, श्रीमती शुभदा चिंचनसुरे, हरीश फुलारी, दीपक साकोळे, सचिन मिटकरी, गौतम माशाळकर, विवेकानंद मुर्के आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन केले.

या उल्लेखनीय निकालाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शिवलिंगआप्पा औटी, सचिव रविशंकर राचट्टे, उपाध्यक्ष विजयकुमार मिटकरी, सहसचिव नागेशआप्पा इळेकर, कोषाध्यक्ष अॅड. श्रीशैल्य रेवशेट्टे तसेच मुख्याध्यापक शरणाप्पा जलसकरे, पर्यवेक्षक गौतम माशाळकर व सर्व शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या