सरकारच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्पात डॉ. प्रा. खलील सिद्दीकी यांची प्रतसंपादकपदी नियुक्ती

  सरकारच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय  प्रकल्पात

डॉ. प्रा. खलील सिद्दीकी यांची प्रतसंपादकपदी नियुक्ती




 लातूर :(प्रतिनिधी) 

पानगाव ता रेणापूर येथील रहिवासी व हिंदुस्तानी एज्युकेशन सोसायटी औसा येथील पर्यवेक्षक पदावर कार्यरत असलेले ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, कवी आणि प्रख्यात लेखक डॉ. प्रा. खलील सिद्दीकी यांची आसाम सरकारच्या उच्च शिक्षण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या पब्लिकेशन बोर्ड आसाम या प्रतिष्ठित संस्थेच्या राष्ट्रीय भाषांतर प्रकल्पासाठी उर्दू भाषेचे प्रतसंपादक (कॉपी एडिटर) म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या साहित्य व शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पब्लिकेशन बोर्ड आसामचे सचिव प्रमोद कलिता यांनी अधिकृत पत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर केली. या पत्रानुसार, प्रख्यात लेखक डॉ. समुद्रगुप्त कश्यप लिखित “महापुरुष श्रीमंत शंकरदेव” या महत्त्वपूर्ण ग्रंथाचे भारतातील विविध प्रमुख भाषांमध्ये भाषांतर व प्रकाशन करण्यात येणार आहे. आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्व सरमा यांनी या प्रकल्पात विशेष रस दाखविला असून भारतीय सांस्कृतिक वारसा आणि संतपरंपरेचा संदेश देशभर पोहोचविण्याचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम मानला जात आहे.

या राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्पासाठी उर्दू भाषेच्या प्रतसंपादनाची जबाबदारी डॉ. प्रा. खलील सिद्दीकी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. भाषेवरील प्रभुत्व, साहित्यिक जाण, संशोधनात्मक दृष्टी आणि विविध भाषांतील अभ्यास या गुणांच्या आधारे त्यांची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

डॉ. प्रा. खलील सिद्दीकी हे शिक्षण, साहित्य, संशोधन आणि पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत आहेत. त्यांनी मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी आणि फारसी अशा विविध भाषांमध्ये उल्लेखनीय लेखन केले असून आतापर्यंत त्यांच्या २८ पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. त्यांच्या साहित्यामध्ये सामाजिक जाणीव, मानवी मूल्ये, प्रेम, सांस्कृतिक समन्वय आणि आधुनिक विचारांचे दर्शन घडते. ते उत्तम वक्ते म्हणूनही परिचित असून विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनांमध्ये त्यांनी सहभाग नोंदविला आहे.

डॉ. सिद्दीकी यांना अनेक साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. विविध मासिकांचे संपादन, संशोधनपर लेखन आणि नवोदित लेखकांना मार्गदर्शन करण्याचे कार्यही ते सातत्याने करीत आहेत. मराठवाड्यातील साहित्यिक चळवळीमध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते.

त्यांच्या या नियुक्तीबद्दल साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. हिंदुस्तानी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी तसेच विविध साहित्य संस्थांनीही आनंद व्यक्त केला आहे. राष्ट्रीय स्तरावरील या महत्त्वपूर्ण प्रकल्पात मराठवाड्यातील एका साहित्यिकाची निवड होणे ही संपूर्ण प्रदेशासाठी गौरवाची बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या