*मजहर पटेल-वृत्तपत्र विक्रेत्यापासून वृत्तपत्र समूहाच्या मालकापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास*

 *मजहर पटेल-वृत्तपत्र विक्रेत्यापासून वृत्तपत्र समूहाच्या मालकापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास*



एक गुणी व्यक्तिमत्त्व,सच्चा पत्रकार,अभ्यासू लेखक आणि मार्गदर्शक...


     पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याची कला नसून, समाजातील वास्तवाला शब्द देण्याची आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची जबाबदारी आहे. ही जबाबदारी प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ भावनेने जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे मजहर पटेल.उर्दू आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व असलेल्या मजहर पटेल यांनी विविध राष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रांमध्ये लेखन करून आपल्या लेखणीची वेगळी ओळख निर्माण केली. दै. एतेमाद, दै. मुन्सीफ, दै. सहारा उर्दू, दै. कामील यकीन, दै. उर्दू टाइम्स, सा. एलान यांसारख्या विविध वृत्तपत्रांतून त्यांनी सातत्याने लिखाण केले. सामाजिक प्रश्न, अन्याय, राजकीय घडामोडी, जनसामान्यांच्या समस्या आणि सकारात्मक विषयांना आपल्या लेखणीतून त्यांनी नेहमीच वाचा फोडली.

विशेषतः लातूर रिपोर्टर च्या माध्यमातून माहितीपूर्ण विषय, सामाजिक कार्य, राजकीय विश्लेषण, स्तंभलेखन आणि संपादकीय लेखन करत त्यांनी वाचकांशी एक अतूट नाते निर्माण केले. त्यांच्या लेखनातून केवळ बातमी नव्हे, तर समाजाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन वाचकांना मिळतो.

      मजहर पटेल यांच्या यशामागे मोठा संघर्ष आणि परिश्रमाचा इतिहास आहे. त्यांचे वडील पै. मौलवी हबीबोद्दीन पटेल यांनी सन १९८५ मध्ये जामा मस्जिद, औसा येथे ‘मरकज दिनी बुक’ या नावाने पुस्तके व वृत्तपत्र विक्रीचा छोटासा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात मजहर पटेल आणि त्यांचे बंधू नजीब पटेल वडिलांना मदत करीत असत.वृत्तपत्रांच्या गठ्ठ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज ‘लातूर रिपोर्टर २४ न्यूज’ आणि ‘लातूर रिपोर्टर वेब न्यूज’ पर्यंत पोहोचला आहे. एका छोट्याशा व्यवसायातून माध्यम क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करून ‘लातूर रिपोर्टर’ समूहाला नाव, लौकिक आणि विश्वास मिळवून देणे, ही त्यांच्या अथक परिश्रमांची आणि दूरदृष्टीची फलश्रुती आहे.

म्हणूनच मनापासून एकच दुवा आहे की त्यांच्या या अथक प्रयत्नांना आणखी मोठे यश लाभावे आणि ‘सा. लातूर रिपोर्टर’चे दैनिकात रूपांतर होऊन ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाशित व्हावे.

     माध्यम क्षेत्रासाठी, विशेषतः हिंदी आणि उर्दू पत्रकारितेसाठी मजहर पटेल हे एक अभ्यासू आणि मौल्यवान व्यक्तिमत्त्व आहेत. नवोदित पत्रकार,लेखक आणि कवींना मार्गदर्शन करणारा, त्यांना प्रोत्साहन देणारा आणि योग्य दिशा दाखविणारा सच्चा पत्रकार व संपादक म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांच्या स्वभावातील आपुलकी, साधेपणा आणि माणुसकी यामुळे मित्रपरिवार, नातेवाईक आणि समाजातील सर्व स्तरांतील लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे, मदतीला धावून जाणे आणि गरजूंना मार्गदर्शन करणे, हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष गुण आहे.माझ्यासाठी तर मजहर भाई केवळ मित्र नाहीत; ते बंधुतुल्य, मार्गदर्शक आणि माझ्या पत्रकारितेच्या प्रवासातील प्रेरणास्थान आहेत.

     सन २००० पासून माझा मजहर भाईंसोबत संपर्क आहे. त्यावेळी मी ‘सा.एलान’ मध्ये लिखाण करीत होतो आणि मजहर पटेल हे ‘सा. एलान’चे औसा तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते.त्यांच्या मधुर स्वभावामुळे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना व बातम्यांना योग्य स्थान देण्याच्या वृत्तीमुळे ‘सा. एलान’ च्या वाचकसंख्येतही मोठी वाढ झाली होती.त्याच काळात मी ‘आँखों देखा हाल’ या सदराखाली लेखन करण्यास सुरुवात केली. माझ्या लेखनाला मजहर पटेल आणि म. मुस्लिम कबीर सर यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले. माझ्या लेखणीवर विश्वास ठेवून त्यांनी मला लिहिण्यासाठी प्रेरित केले. आजपर्यंत मी जे काही लिहीत आलो आहे, त्यामागे त्यांच्या प्रोत्साहनाचा आणि मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे.

म्हणूनच मजहर भाई माझ्यासाठी केवळ पत्रकारितेतील सहकारी नाहीत, तर माझ्या लेखणीला दिशा देणारे निस्वार्थ आणि सच्चे मार्गदर्शक आहेत.

     पत्रकारितेसोबतच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातही मजहर पटेल यांचा विशेष सहभाग राहिला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था आणि संघटनांनी त्यांचा विविध पुरस्कारांनी गौरव केला आहे.सन २०१४ मध्ये औसा तालुका पत्रकार संघाकडून आणि सन २०१८ मध्ये लातूर जिल्हा पत्रकार संघाकडून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच औसा तालुका पत्रकार संघ, ऊर्दू अदब-ए-हिंद, पटेल ट्रस्ट आणि सोशल एज्युकेशन संस्था अशा विविध संस्थांमध्ये त्यांनी पदाधिकारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

     आज १५ ऑगस्ट,माझे जिवलग मित्र, बंधुतुल्य व्यक्तिमत्त्व आणि सच्चे मार्गदर्शक मजहर भाईंचा वाढदिवस.या आनंदाच्या प्रसंगी अल्लाह-तआला जवळ दुवा करतो की,अल्लाह-तआला मजहर भाईंना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समाधान आणि यश प्रदान करो. त्यांच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत. त्यांच्या लेखणीला अधिक बळ मिळो आणि त्यांच्या माध्यमातून समाजाला सातत्याने सकारात्मक, निर्भीड आणि दिशादर्शक पत्रकारिता लाभो. ‘लातूर रिपोर्टर’ समूहाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नावलौकिक मिळो आणि त्यांच्या सर्व भावी संकल्पांना यश लाभो.आमीन...!


*–व्यक्तिविशेष लेख....*

ॲड.इकबाल रसूलसाब शेख, औसा/मो. 9545253786

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या