बांधकाम कामगारांच्या ३३ लाख प्रलंबित अर्जांवरून १३ ऑगस्टपासून आझाद मैदानात बेमुदत आंदोलन

 बांधकाम कामगारांच्या ३३ लाख प्रलंबित अर्जांवरून १३ ऑगस्टपासून आझाद मैदानात बेमुदत आंदोलन





शैक्षणिक योजना पूर्ववत करा; प्रलंबित लाभ तातडीने द्या — लोकसत्ता युवा संघटना व बांधकाम कामगार संघटनेचा इशारा


लातूर, दि. १० ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्रातील बांधकाम व इतर कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी लोकसत्ता युवा संघटना व महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने १३ ऑगस्ट २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदानावर तीव्र स्वरूपाचे बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे. बंद करण्यात आलेल्या शैक्षणिक योजना पूर्ववत सुरू कराव्यात, सुमारे ३३ लाख प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढावेत तसेच कामगारांना मंजूर असलेले आर्थिक लाभ तत्काळ वितरित करावेत, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली आहे.


महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून कामगार व त्यांच्या पाल्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. मात्र, प्रशासनातील दिरंगाई आणि ऑनलाइन प्रक्रियेतील त्रुटींमुळे लाखो पात्र कामगार व त्यांचे कुटुंबीय योजनांच्या लाभांपासून वंचित असल्याचा आरोप संयुक्त कृती समितीने केला आहे.



कामगार विभागाने १३ जुलै २०२६ रोजी शैक्षणिक सहाय्याच्या योजनांमध्ये केलेले बदल अन्यायकारक असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणारे शैक्षणिक सहाय्य बंद करण्यात आल्याने बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित शासन निर्णय तातडीने रद्द करून पहिली ते आठवीसह पूर्वीच्या सर्व शैक्षणिक व कल्याणकारी योजना पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.



ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत निर्माण झालेल्या अडचणी आणि संबंधित कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणावर अर्ज प्रलंबित असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. सुमारे ३३ लाख पात्र अर्ज तातडीने मंजूर करून संबंधित कंत्राटदारांच्या कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


कामगारांच्या नोंदणी अर्जांमध्ये पाल्यांच्या नावांमध्ये किंवा आधार क्रमांकामध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी अनेक कामगारांनी दोन ते तीन वर्षांपूर्वी अर्ज केले आहेत. मात्र, अद्याप या दुरुस्त्या झालेल्या नसल्याने अनेक कामगारांची मुले शैक्षणिक व इतर योजनांच्या लाभांपासून वंचित राहत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. या दुरुस्त्या जिल्हास्तरावर आणि ऑनलाइन पोर्टलवर तातडीने करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.




महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्यानुसार कामगारांचे अर्ज निर्धारित कालमर्यादेत निकाली काढणे आवश्यक असताना अनेक अर्ज दीर्घकाळ प्रलंबित असल्याचा दावा करण्यात आला आहे. BOCW पोर्टलवर संपूर्ण ऑनलाइन व पारदर्शक व्यवस्था निर्माण करून लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.


तसेच घरबांधणी, शिष्यवृत्ती, विवाह सहाय्य, अंत्यविधी सहाय्य आणि गंभीर आजारासाठीचे आर्थिक सहाय्य यांसारख्या योजनांचे मंजूर व प्रलंबित पैसे कामगारांच्या बँक खात्यात तातडीने जमा करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.


या मागण्यांकडे शासनाने आणि प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन १३ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावरील आंदोलन सुरू होण्यापूर्वी सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन संयुक्त कृती समितीने केले आहे.


याबाबतचे निवेदन लोकसत्ता युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इलाही बशीरसाब शेख यांच्या वतीने संबंधित शासन व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती सहाय्यक कामगार आयुक्त, लातूर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना माहिती व योग्य कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या