औसा नगर परिषदेकडून ‘इझी क्लीन’ मशीनचा शुभारंभ; शहर स्वच्छतेला मिळणार नवी गती
औसा, प्रतिनिधी :
औसा नगर परिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेला अधिक गतिमान, प्रभावी आणि आधुनिक बनविण्याच्या उद्देशाने नगर परिषदेकडून अत्याधुनिक ‘इझी क्लीन’ कचरा संकलन मशीनचा शुभारंभ शुक्रवार, दि. 29 मे रोजी सकाळी 8 वाजता औसा बसस्थानकासमोर करण्यात आला. उपनगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या मशीनचे लोकार्पण करण्यात आले.
नगराध्यक्ष परवीन शेख, मुख्याधिकारी मंगेश शिंदे आणि स्वच्छता विभागाच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील कचरा अधिक वेगाने व प्रभावीपणे संकलित होणार असून स्वच्छता व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार आहे. नागरिकांच्या आरोग्याचे संवर्धन आणि स्वच्छ, सुंदर औसा घडविण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची पाऊलवाट ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या प्रसंगी पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव, नगरसेवक आनंद बनसोडे, स्वच्छता विभागाचे कर्मचारी तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी सांगितले की, शहरातील स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या नाल्यांमधील गाळ व कचरा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्या स्वच्छ व वाहत्या करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून नागरिकांनाही स्वच्छता अभियानात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
औसा नगर परिषदेच्या या आधुनिक उपक्रमामुळे शहराच्या स्वच्छता व्यवस्थेला नवी दिशा मिळणार असून नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.




0 टिप्पण्या