औसा आगाराच्या ताफ्यात नव्या पाच एसटी बसेस दाखल
आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते पूजन करून नव्या बसेस आगाराकडे सुपूर्द..
औसा प्रतिनिधी
औसा, दि. ३० ऑगस्ट २०२६ : औसा तालुक्यातील प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये भर पडली असून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) औसा बस आगाराला नव्या पाच बसेस देण्यात आल्या आहेत. या नव्या बसेसचे आज औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर या बसेस औसा आगाराकडे सुपूर्द करण्यात आल्या.
औसा आगाराच्या ताफ्यात नव्या बसेस दाखल झाल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक चांगली व नियमित बससेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. नव्या बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नव्या बसेस मिळाल्याबद्दल औसा आगाराच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले.
औसा तालुक्यातील वाढती प्रवासी संख्या आणि ग्रामीण भागातील दळणवळणाची गरज लक्षात घेता नव्या बसेस उपलब्ध करून दिल्याने नागरिकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.





0 टिप्पण्या