औसा नगर परिषदेत ‘चिरीमिरी’ला आळा घालण्याची मागणी
नगरसेविका सय्यद हंसा मुस्तफा यांचा मुख्याधिकाऱ्यांना इशारा; पारदर्शक प्रशासनासाठी विभाग फेरबदलाची मागणी
औसा (प्रतिनिधी):
औसा नगर परिषदेत नागरिकांची कामे करण्यासाठी काही कर्मचाऱ्यांकडून ‘चिरीमिरी’ मागितली जात असल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. नगरसेविका सय्यद हंसा मुस्तफा यांनी या प्रकारावर कठोर नाराजी व्यक्त करत मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे.
नागरिकांकडून येणाऱ्या वाढत्या तक्रारींचा उल्लेख करत त्यांनी म्हटले आहे की, अनेक कर्मचारी नियमांचे कारण देत कामे लांबवतात आणि अप्रत्यक्षपणे पैसे मागतात. काही ठिकाणी खाजगी एजंटच्या माध्यमातूनही व्यवहार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पैसे न देणाऱ्या नागरिकांची कामे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.
याशिवाय, अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी स्वतःची मक्तेदारी निर्माण केली आहे. यामुळे प्रशासनात पारदर्शकतेचा अभाव जाणवत असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर, संबंधित कर्मचाऱ्यांना कडक समज देऊन तातडीने त्यांचे विभाग बदलावे आणि भ्रष्टाचारावर आळा घालावा, अशी मागणी नगरसेविकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी निवेदन देताना जावेद शेख,मेहराज शेख,खादर सय्यद, रफीक मुंगले, कृष्णा सावळकर,बासिद शेख, वकील मुस्तफा इनामदार, पटेल यांची उपस्थिती होती.
आता मुख्याधिकारी या प्रकरणावर कोणती ठोस कारवाई करतात, याकडे औसा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या