शहरातील रखडलेली स्वच्छता तात्काळ सुरळीत करा, अन्यथा नगर परिषदेला ‘टाळे ठोको’ आंदोलन!
एम.आय.एम. चा मुख्याधिकाऱ्यांना इशारा; नवीन ठेकेदाराच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
औसा (प्रतिनिधी):
औसा शहरातील सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न गेल्या तीन महिन्यांपासून गंभीर बनला असून, नगर परिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एम.आय.एम. पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. या संदर्भात एम.आय.एम.चे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
शहरात मागील ठेकेदार संपावर गेल्यामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडाला होता. त्यानंतर प्रशासनाने नवीन ठेकेदाराला काम दिले असले तरी, अद्याप शहरातील कचरा संकलन आणि गटारांची साफसफाई विस्कळीतच आहे. अनेक प्रभागांत अनेक दिवसांपासून घंटागाडी फिरकलेली नाही, परिणामी रस्त्यांवर आणि गल्लीबोळांत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. साचलेल्या कचऱ्यामुळे आणि तुंबलेल्या गटारांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, लहान मुले व वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे.यावेळी
निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, नवीन ठेकेदाराला टेंडर देऊनही कामात सुधारणा होत नसल्याने संबंधित ठेकेदाराचे टेंडर रद्द करावे. त्याऐवजी नगर परिषदेने स्वतः रोजंदारीवर मजूर लावून स्वच्छता मोहीम हाती घ्यावी. तसेच, जर जुन्या ठेकेदाराचे कर्मचारी शासकीय कामात अडथळा निर्माण करत असतील, तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून ४० हजार लोकसंख्या असलेल्या शहराची होणारी पिळवणूक थांबवावी.
जर येत्या काही दिवसांत शहरातील स्वच्छता पूर्ववत झाली नाही, तर एम.आय.एम.च्या वतीने नगर परिषद कार्यालयाला 'टाळे ठोको' आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
हे निवेदन देताना एम.आय.एम. औसा प्रमुख सय्यद मुजफ्फरअली इनामदार, अजहर कुरेशी, शेख नय्युम, शेख मुशीर, शेख अलीम यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती सहआयुक्त (नगर परिषद प्रशासन, लातूर) आणि पोलीस निरीक्षक (औसा) यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.


0 टिप्पण्या