मोमीन गल्लीत पाणीपुरवठ्यासाठी नवी पाइपलाईन, शहरात धुर फवारणीची मागणी

 मोमीन गल्लीत पाणीपुरवठ्यासाठी नवी पाइपलाईन, शहरात धुर फवारणीची मागणी





औसा (प्रतिनिधी) : औसा शहरातील पाणीपुरवठा व वाढत्या डासांच्या प्रादुर्भावाच्या समस्यांकडे लक्ष वेधत भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगर परिषदेकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.


भाजपचे कार्यकर्ते उमर गुलामहुसेन पंजेशा यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, प्रभाग क्रमांक ९ मधील मोमीन गल्ली येथे अलीम करपुडे यांच्या घरापासून महंमद बागवान मार्गे वाजीद चौधरी यांच्या घरापर्यंतचा रस्ता अत्यंत अरुंद व बोळ स्वरूपाचा असल्याने तेथे यंत्रसामग्रीद्वारे काम करणे शक्य नाही. या भागात जुनी पाइपलाईन बंद अवस्थेत असून नागरिकांना दीर्घकाळापासून पाणीपुरवठा होत नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी मॅन्युअल पद्धतीने खोदकाम करून नवीन पाइपलाईन टाकून लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.


तसेच, सध्या शहरातील सफाई कामगारांच्या संपामुळे अनेक भागात कचऱ्याचे ढिग साचले असून डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा परिणाम लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित प्रश्न तातडीने सोडवून शहरात धुर व पावडर फवारणी करून डासांचा प्रादुर्भाव रोखावा, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.


वरील दोन्ही प्रश्न तातडीने मार्गी लावून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा भाजपच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या