औसा पंचायत समितीवर भाजपचा झेंडा; सभापतीपदी गंगाबाई कोदळीकर तर उपसभापतीपदी अमोल पाटील

 औसा पंचायत समितीवर भाजपचा झेंडा; सभापतीपदी गंगाबाई कोदळीकर तर उपसभापतीपदी अमोल पाटील




 नवनिर्वाचित सभापती उपसभापतीचे आ अभिमन्यू पवार यांच्याकडून सत्कार 


औसा- औसा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत पंचायत समितीवर आपला झेंडा फडकावला आहे. औसा पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या ताब्यात सभापती आणि उपसभापती पदे गेल्याने राजकीय वर्तुळात या निकालाची मोठी चर्चा होत आहे.


सभापती पदासाठी एकूण दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती कोदळीकर गंगाबाई माणिकराव (थोरात) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार पंचफुलाबाई सुधाकरराव घोडके यांच्यात थेट लढत झाली. मतदान प्रक्रियेनंतर गंगाबाई कोदळीकर यांना एकूण १२ मते मिळाली, तर पंचफुलाबाई घोडके यांना ६ मते मिळाली. त्यामुळे पिठासीन अधिकाऱ्यांनी गंगाबाई माणिकराव कोदळीकर (थोरात) यांची औसा पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.


उपसभापती पदासाठी देखील दोन उमेदवार रिंगणात होते. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अमोल साहेबराव पाटील आणि इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार किशोर देविदास जवंजाळे यांच्यात सामना झाला. या निवडणुकीत अमोल पाटील यांना १२ मते मिळाली, तर किशोर जवंजाळे यांना ६ मते मिळाली. त्यानुसार अमोल साहेबराव पाटील यांची औसा पंचायत समितीच्या उपसभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली.


निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी नवनिर्वाचित सभापती गंगाबाई कोदळीकर आणि उपसभापती अमोल पाटील यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी त्यांनी औसा पंचायत समितीच्या माध्यमातून विकासकामांना अधिक गती देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.


औसा पंचायत समितीवर भाजपचा पहिल्यांदाच ताबा मिळाल्यामुळे स्थानिक राजकारणात मोठा बदल झाल्याचे मानले जात असून, आगामी काळात पंचायत समितीच्या माध्यमातून विविध विकासकामांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, जिल्हा सरचिटणीस सुभाष जाधव, बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, माजी नगराध्यक्ष किरण उटगे, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष परीक्षीत पवार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष विष्णू कोळी, काकासाहेब मोरे, प्रवीण कोपरकर,रवी चिलमे,कल्पना डांगे, सुनिता सूर्यवंशी आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या