लातूर जिल्ह्यात इंधन तुटवडा नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका — जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 लातूर जिल्ह्यात इंधन तुटवडा नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका — जिल्हा प्रशासनाचे आवाहन


औसा प्रतिनिधी 

लातूर, दि. ४ मार्च : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवा काही ठिकाणी पसरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या अफवांमुळे जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी अतिरिक्त इंधन साठवण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले आहे.


या संदर्भात जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, लातूर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. सर्व पेट्रोल पंपांना तेल कंपन्यांच्या विक्री अधिकाऱ्यांमार्फत नियमितपणे इंधन पुरवठा केला जात असून पुरवठा अखंडित राहण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.


जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत माहितीकरिता नागरिकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश राब्लैंड यांनीही नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन करताना सांगितले की, जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा नाही. पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा नियमितपणे सुरू आहे. नागरिकांनी अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे.


खुल्या भांड्यात पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी


दरम्यान, सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील कोणत्याही पेट्रोल पंपावरून पेट्रोल किंवा डिझेल हे खुल्या बाटली, कॅन, डबा किंवा इतर कोणत्याही भांड्यात देण्यास तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांनी जारी केला आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, पेट्रोलियम नियम २००२ मधील तरतुदीनुसार पेट्रोल-डिझेल हे केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच भरून देणे बंधनकारक आहे. पेट्रोल पंपावरून खुले इंधन विक्री करणे नियमबाह्य व बेकायदेशीर असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.


प्रशासनाने सांगितले की, अफवांमुळे काही नागरिक बाटल्या किंवा कॅनमध्ये पेट्रोल साठवण्याचा प्रयत्न करू शकतात. पेट्रोल-डिझेल हे ज्वलनशील पदार्थ असल्याने अशा प्रकारे साठवणुकीमुळे अपघात किंवा अनुचित घटना घडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे.


आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक व मालकांनी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणे आणि इंधन विक्रीची नोंद नियमितपणे ठेवणे बंधनकारक राहणार आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत पेट्रोल-डिझेल कॅन, बाटली किंवा इतर भांड्यात विक्री अथवा पुरवठा करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध पेट्रोलियम नियम २००२, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.


जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप मालक, पोलीस अधिकारी, तहसीलदार आणि संबंधित विभागांना या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या