औसा तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर’ उपक्रमाला प्रारंभ
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने औसा तालुक्यात महसूल विभागातर्फे ‘समाधान शिबीर’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांच्या दैनंदिन महसुली प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर व विद्यार्थ्यांच्या विविध कामांशी निगडित विभाग आहे. रेशनकार्ड, सातबारा उतारे, उत्पन्न व रहिवासी दाखले, जात प्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्रे आदी सेवा वेळेत आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात, तसेच नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण व्हावे, या उद्देशाने औसा तहसील कार्यालयामार्फत मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
नियोजित कार्यक्रमानुसार ७ मार्च रोजी कीनीथोट व लामजना, ८ मार्च रोजी औसा, १० मार्च रोजी मातोळा व भादा, १४ मार्च रोजी बेलकुंड व किल्लारी, तर १७ मार्च रोजी उजनी येथे समाधान शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
या शिबिरांमध्ये महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या अर्जांची छाननी करून त्वरित कार्यवाही करणार आहेत. त्यामुळे संबंधित मंडळातील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या प्रलंबित समस्या मार्गी लावाव्यात, असे आवाहन तहसीलदार घनश्याम अडसूळ, नायब तहसीलदार सुरेश पाटील व मंडळ अधिकारी मुस्तफा खोंदे यांनी केले आहे.
हा उपक्रम लोकाभिमुख प्रशासनाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरत असून, नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

0 टिप्पण्या