औसा येथे भव्य ‘दावत-ए-इफ्तार’ संपन्न; सामाजिक एकतेचा दृढ संदेश

 औसा येथे भव्य ‘दावत-ए-इफ्तार’ संपन्न; सामाजिक एकतेचा दृढ संदेश






औसा (प्रतिनिधी): शहराच्या गंगा-जमुनी संस्कृतीला अधिक बळकटी देत सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा प्रेरणादायी संदेश देणारा भव्य ‘दावत-ए-इफ्तार’ कार्यक्रम रविवारी (१ मार्च) रोजी उत्साहात पार पडला. श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्नेह मिलन सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


शहरातील अबुल कलाम आझाद चौक येथील विविध कार्यकारी सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी श्रीशैल्य उटगे (महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष) यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाने सर्वधर्मीय ऐक्याचा सुंदर आदर्श घालून दिला.


कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, व्यापारी आणि पत्रकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये विजयकुमार बोरफले (चेअरमन), नझीर मुजावर (उपाध्यक्ष), शेख शकील, शेख रशीद, शेख सनाउल्ला दारुवाले, शाहनवाज पटेल, खुंदमीर मुल्ला, पाशाभाई शेख, खाजाभाई शेख, गितेश शिंदे, फहीम शेख, दत्तोपंत सूर्यवंशी, जहीरोद्दीन नांदुरगे तसेच औसा तालुका पत्रकार संघ चे अध्यक्ष काशिनाथ सगरे,माजी अध्यक्ष संजीव सगरे,  जेष्ठ पत्रकार रमेश दुरूगकर, महेबुब बख्शी, रमेश शिंदे, रामभाऊ कांबळे, मुख्तार मणियार, बालाजी शिंदे आणि संभाजी शिंदे आदींचा समावेश होता.


पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणत प्रेम, सौहार्द आणि सामाजिक समरसतेचा संदेश देण्यात आला. आयोजकांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “औसा शहरात अनेक वर्षांपासून सर्वधर्मीय बांधव गुण्यागोविंदाने नांदत आहेत. ही परंपरा पुढे नेण्यासाठी आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.”


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या संचालक, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या नागरिकांमुळे शहरात आनंद, एकता आणि बंधुभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या