ई-पिक पाहणीतील तांत्रिक अडचणींमुळे हजारो शेतकरी हमीभावापासून वंचित; मुदतवाढीची मागणी

 ई-पिक पाहणीतील तांत्रिक अडचणींमुळे हजारो शेतकरी हमीभावापासून वंचित; मुदतवाढीची मागणी






औसा, प्रतिनिधी:

सध्या हरभरा, ज्वारी, गहू आदी रब्बी पिकांच्या काढणीला सुरुवात झाली असताना बाजारात हरभऱ्याला सुमारे ५२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. मात्र शासनाने जाहीर केलेला हमीभाव ५८७५ रुपये असून सध्याच्या बाजारभावात आणि हमीभावात जवळपास ७०० रुपयांचा फरक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


हमीभावाने हरभरा खरेदीसाठी केंद्र शासनामार्फत नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यासाठी ई-पिक पाहणी करणे अनिवार्य आहे. या प्रक्रियेसाठी सहाय्यकांचीही नेमणूक करण्यात आली होती. ई-पिक पाहणी करण्याची अंतिम मुदत १० मार्च २०२६ अशी निश्चित करण्यात आली होती.


मात्र १ मार्चपासूनच सर्व्हरची गती कमी-जास्त होत होती आणि ६ मार्च २०२६ पासून सर्व्हर पूर्णपणे बंद झाल्याने हजारो शेतकरी सहाय्यकांमार्फत ई-पिक पाहणी नोंदणी करू शकले नाहीत. परिणामी अनेक शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा विक्रीसाठी नोंदणी करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.


या पार्श्वभूमीवर सहाय्यकांमार्फत ई-पिक पाहणी करणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी औसा येथील सामाजिक कार्यकर्ते उमर भाई पंजेशा यांनी केली आहे. यासंदर्भात औसा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले असून शेतकऱ्यांच्या हितासाठी त्वरित निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या