औसेकरांचा विश्वास सार्थ ठरवू ; प्रभारी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख
औसा, प्रतिनिधी :
औसा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षा सौ. परवीन शेख यांनी काही कारणास्तव रजा घेतल्याने रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्याकडे प्रभारी स्वरूपात सोपविण्यात आली आहे. डॉ. अफसर शेख यांनी शुक्रवार, १९ जून रोजी दुपारी प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.
यावेळी आयोजित कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी तसेच शहरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी डॉ. अफसर शेख यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना डॉ. अफसर शेख यांनी सर्व औसेकरांचे आभार मानले. नागरिकांनी पक्षावर आणि नेतृत्वावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. औसा नगरपालिकेच्या निवडणुकीत दिलेले ‘सर्वांगीण आणि समतोल विकास’ हे वचन पुढील साडेचार वर्षांत पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
“शहराच्या विकासासाठी लोकसहभागातून काम करताना सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच जनतेपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहू,” असेही डॉ. शेख यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. डॉ. अफसर शेख यांच्या नेतृत्वामुळे औसा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय व संघटनात्मक कार्याला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.







0 टिप्पण्या