शिवली मोड येथील धक्कादायक घटना; मध्यप्रदेशातील १९ वर्षीय कामगाराचा मारहाणीत मृत्यू




औसा, प्रतिनिधी :


औसा तालुक्यातील शिवली मोड परिसरात शौचास बसल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत मध्यप्रदेशातील १९ वर्षीय परप्रांतीय मजूर कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी वानवडा शिवारात घडली. या प्रकरणी औसा पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.


मृत कामगाराचे नाव संदीप रामनाथ गौंड (वय १९, रा. दुधोनिया, ता. हिलगन, जि. सागर, मध्यप्रदेश) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औसा-तुळजापूर महामार्गालगत वानवडा शिवारात एलपीजी गॅस पाईपलाईनचे काम सुरू असून त्यासाठी मध्यप्रदेशातील काही मजूर येथे वास्तव्यास आहेत. हे कामगार शिवली मोड येथील एका ढाब्याजवळ भाड्याच्या खोलीत राहत होते.


गुरुवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास संदीप गौंड हा शौचासाठी शेतमालक बाळासाहेब वसंत माने यांच्या उसाच्या शेतात गेला होता. यावेळी ठिबक सिंचन व्यवस्था खराब होत असल्याच्या कारणावरून शेतमालकाने संताप व्यक्त करत संदीपला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत संदीप गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. त्याच्यासोबत असलेल्या यशवंत ठाकूर यालाही मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.


गंभीर जखमी अवस्थेतील संदीपला तातडीने औसा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.


या घटनेप्रकरणी राजेश हडवळे, व्यवस्थापक, ओनिक्या इन्फ्रा प्रा. लि., पुणे यांच्या फिर्यादीवरून औसा पोलिस ठाण्यात बाळासाहेब माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरिक्षक आर के डमाले यांच्या मार्गदर्शनाखाली  सहायक पोलिस निरीक्षक  (सपोनि) कृष्णा घायवट या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

एका क्षुल्लक कारणावरून तरुणांची हत्या झाल्याने वानवडा परिसरात खळबळ उडाली आहे.