फसव्या कर्जमुक्तीच्या जीआरची होळी; रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा
लातूर, प्रतिनिधी : शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीकविमा मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने लातूर येथे आंदोलन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून राज्य सरकारच्या कर्जमुक्ती धोरणाचा निषेध करण्यात आला.
यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारने नुकत्याच जारी केलेल्या कर्जमुक्तीच्या शासन निर्णयाची (जीआर) प्रत जाळून निषेध व्यक्त केला. कर्जमुक्ती योजनेत अनेक जाचक अटी व शर्थी घालण्यात आल्याने बहुतांश शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
आंदोलनादरम्यान बोलताना राजीव कसबे यांनी सांगितले की, उद्योगपतींची मोठ्या प्रमाणावरील कर्जे विनाअट माफ केली जातात; मात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी विविध अटी लादल्या जात आहेत. पीकविमा, शेतीमालाला हमीभाव आणि कर्जमुक्ती यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शेतकरी नेते रविकांत तुपकर हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत असून त्यांच्या आंदोलनाची सरकारने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात सत्तार पटेल, राजेंद्र आबा मोरे, अरुण दादा कुलकर्णी, नवनाथ शिंदे, प्रज्योत हुडे, शाम जाधव, सतीश राठोड, इमाम सय्यद, विशाल ढोबळे, बालाजी सूर्यवंशी, गौतम कांबळे, दत्ता किनीकर, आदेश कसबे, बालाजी हौळ पाटील, मारुती कसबे, प्रवीण गायकवाड, सतीश चोरमले,एम एम जगताप,बबलू शेख,आकाश घुटलकर यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या