औसा शहरातील मूलभूत सुविधा सुरळीत करा -सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा : औसा शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात नगर परिषद प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत एमआयएमच्या वतीने नगर परिषदेला निवेदन देण्यात आले आहे. शहरातील पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि नालेसफाईच्या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.
निवेदनानुसार, तीव्र उन्हाळ्यात शहरातील नळधारकांना दहा ते पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे. माकणी व तावरजा प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा होत असताना आणि कोट्यवधी रुपयांची योजना राबविण्यात आली असतानाही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. याबाबत विचारणा केल्यास मोटार खराब असल्याचे कारण दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच शहरातील अनेक प्रभागांमध्ये चार ते पाच दिवस घंटागाडी येत नसल्याने नागरिकांना कचरा उघड्यावर टाकावा लागत आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. घंटागाड्यांची संख्या अपुरी असल्याने दोन ते तीन वार्डांसाठी एकच घंटागाडी कार्यरत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय शहरातील नाले व गटारींची नियमित स्वच्छता होत नसून दोन-दोन महिने साफसफाई केली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व नाल्यांची तातडीने स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
एमआयएमचे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांनी वरील सर्व मागण्या तात्काळ पूर्ण करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी केली आहे. अन्यथा एमआयएमच्या वतीने नगर परिषद प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

0 टिप्पण्या