औशात 'सकल मराठा समाजा'कडून मुस्लिम बांधवांना दावत -ए-इफ्तार

 औशात 'सकल मराठा समाजा'कडून मुस्लिम बांधवांना  दावत -ए-इफ्तार 








औसा : प्रतिनिधी

तालुक्यात नेहमीच सामाजिक सलोखा जपला जातो. याच परंपरेला उजाळा देत, रमजानच्या पवित्र महिन्याचे औचित्य साधून सकल मराठा समाज, औसा तालुक्याच्या वतीने शुक्रवारी 13 मार्च रोजी मुस्लिम बांधवांसाठी भव्य 'दावत-ए-इफ्तार' चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून औसा शहरात हिंदू-मुस्लिम बांधवांच्या अतूट मैत्रीचे आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले.

औसा टी-पॉईंट येथील हाशमी चौकातील एम.आर.एफ. शोरूम परिसरात शुक्रवारी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी ६ वाजून ४२ मिनिटांनी रोजा इफ्तारची वेळ होताच, हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येत इफ्तारचा आस्वाद घेतला.


या इफ्तार पार्टीत तालुक्यातील दोन्ही समाजातील प्रतिष्ठित नागरिक, राजकीय नेते, तरुण आणि ज्येष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये औसा तहसीलदार घनश्याम आडसुळ, उपनगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख, मराठा समाजाचे मंहतगिरी महाराज,शेख शकील,नगर सेवक जावेद शेख, मुजाहेद शेख,खुंदमीर मुल्ला,मुजम्मील शेख,अजहर हाशमी,आदम पठाण, सय्यद मुजफ्फर आली इनामदार,शेख  सनाऊल्ला दारुवाले,अनीस जहागीरदार,नियामत लोहारे,फय्युम शेख,पाशाभाई शेख, खाजाभाई शेख,नजीर मुजावर सर, डॉक्टर मुजाहिद  शरीफ,  शेख नजीर डॉक्टर, वहीद कुरेशी, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजीव सगरे, महेबुब बख्शी, एम बी मणियार, आफताब शेख यांच्या सह अनेक  मुस्लिम बांधवांनी या इफ्तार पार्टीला हजेरी लावली होती.केवळ धार्मिक कार्यक्रम म्हणून न पाहता, एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी होऊन आनंद द्विगुणित करण्याचा संदेश यातून देण्यात आला.यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने सकल मराठा समाजाच्या बांधवाचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सकल मराठा समाजाच्या वतीने उपस्थित मान्यवरांना  रमजानच्या शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी औसा तालुक्यातील 

सकल मराठा समाजाचे बाधव  यांनी परिश्रम घेतले.


 

या उपक्रमामुळे औसा शहराने पुन्हा एकदा 'गंगा-जमनी' संस्कृतीचा वारसा जपत संपूर्ण जिल्ह्यासमोर सामाजिक ऐक्याचे एक आदर्श उदाहरण ठेवले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या