प्रभाग क्रं. 10 मध्ये अस्वच्छतेचे 'साम्राज्य'; नागरिकांच्या आरोग्याला धोका!
नालेसफाई, पथदिवे बसवा; MIM औसा प्रमुखांची मुख्याधिकारींकडे निवेदनाद्वारे मागणी
औसा: प्रतिनिधी
औसा शहरातील प्रभाग क्रं. 10 मध्ये अपूर्ण सोईसुविधा, घाणीचे साम्राज्य आणि तुंबलेल्या नाल्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रश्नांकडे नगरपालिकेने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी एम.आय.एम. (MIM) औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
प्रभागात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान फिरत असताना, प्रभाग क्रं. 10 मधील अनेक भागांत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे इनामदार यांच्या निदर्शनास आले. या भागांत सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे, ज्यामुळे डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. नागरिकांना या साथीच्या आजारांपासून वाचवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
स्वच्छता आणि पथदिव्यांची मुख्य मागणी
सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात,
* पोस्ट ऑफिस समोर येणारी नाली
* जलालशाही चौकाकडे जात असलेली नाली
* किल्ला परिसर
* कटगर गल्ली येथील शादीखाना समोरील बाजू
* राममंदिर कटगर भागातील गटारी
या भागांतील नाल्यांची व गटारींची संपूर्ण स्वच्छता करून घ्यावी, तसेच गटारीच्या बाजूस वाढलेले गवत तातडीने काढून घेण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यासोबतच, प्रभागातील अनेक ठिकाणी पथदिवे (स्ट्रीट लाईट्स) नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरते. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी व सुरक्षेसाठी अपूर्ण असलेले पथदिवे त्वरित बसवावेत, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्याधिकारी यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन, प्रभाग क्रं. 10 मधील सोईसुविधा व स्वच्छतेची कामे तात्काळ पूर्ण करावीत, अशी अपेक्षा सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी व्यक्त केली आहे.

0 टिप्पण्या