“अंत्योदयाचा दीप उजळला औशात” — आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते २५ महिलांना शिलाई मशिन्स व ५० विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप;
औसा - दीपावलीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत औसा विधानसभा मतदारसंघात आमदार अभिमन्यू पवार यांच्या वतीने समाजहितार्थ एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. भटक्या विमुक्त समाजातील महिलांच्या बचत गटांना २५ शिलाई मशिन्स, तसेच समाजातील ५० विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करून स्वावलंबनाचा आणि शिक्षणाचा दीप उजळविण्याचे कार्य करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या “अंत्योदय” या विचारधारेचा आत्मा — समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा प्रकाश पोहोचवणे — या ध्येयातून हा उपक्रम साकारला गेला.
या कार्यक्रमास भटके विमुक्त देवगिरी प्रांत सहसंयोजक श्री. सुधाकर कुलकर्णी, भटके विमुक्त राष्ट्रीय कार्यवाह श्री. नरसिंगजी झरे आणि प्रा. अशोक तांबे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना शिलाई मशिन्स व सायकलींचे वाटप करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, चंद्रकांत जेरिगुंटे, संगम कोटलवार, तसेच आमदार पवार यांच्या पत्नी सौ. शोभा पवार, भाजप परिवारातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमाचे उद्दिष्ट भटक्या विमुक्त समाजातील महिलांना स्वावलंबनाच्या मार्गावर आणणे आणि विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हे आहे. शिलाई मशिन्समुळे महिलांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध होईल, ज्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील. तर सायकलींमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुलभ होईल.
आमदार अभिमन्यू पवार म्हणाले, “अंत्योदय हा भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेचा आत्मा आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा प्रकाश पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. दीपावलीचा प्रकाश प्रत्येक घरात पोहोचावा, म्हणूनच हा छोटासा पण मनापासून केलेला प्रयत्न आहे.”
भटकंती करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांच्या जीवनात स्वावलंबनाचा दीप प्रज्वलित करण्याचा हा प्रयत्न औसा मतदारसंघात नवचैतन्य निर्माण करणारा ठरला आहे. दीपावलीच्या या सामाजिक उपक्रमाने औसा परिसरात आनंद, आशा आणि विकासाचा सुगंध दरवळला आहे. या उपक्रमामुळे समाजातील वंचित घटकांच्या आयुष्यात खर्या अर्थाने “अंत्योदयाचा प्रकाश” पोहोचल्याची भावना उपस्थितांमध्ये दिसून आली.
---

0 टिप्पण्या