औसा नगरपरिषद निवडणुकीपूर्वी १०० हून अधिक मतदारांच्या नावात बदल; युवक काँग्रेसची दुरुस्तीची मागणी!

 औसा नगरपरिषद निवडणुकीपूर्वी १०० हून अधिक मतदारांच्या नावात बदल; युवक काँग्रेसची दुरुस्तीची मागणी!




औसा प्रतिनिधी


औसा नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आणि नावांमध्ये बदल झाल्याचे उघडकीस आले आहे. भारतीय युवक काँग्रेसचे औसा शहर अध्यक्ष श्री. पवन अंगद कांबळे यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधले असून, या संदर्भात  औसा तहसीलदार व नगर परिषदेचे मुख्याधिकारी  यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे.

युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन कांबळे यांनी १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर परिषदेने प्रदर्शित केलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये विधानसभा मतदार यादीनुसार नावे नाहीत. केवळ प्रभाग क्रमांक १ मध्येच सुमारे १०० ते १५० मतदारांच्या नावांमध्ये बदल झालेले आहेत. यामध्ये मतदाराचे नाव आणि वडिलांचे नाव यांच्या क्रमात बदल झाला आहे.

कांबळे यांनी स्वतःचे उदाहरण देत हा घोळ स्पष्ट केला. त्यांचा विधानसभा मतदार यादी तसेच विद्यमान निवडणूक विभागाच्या रेकॉर्डमध्ये 'पवन अंगद कांबळे' असा उल्लेख असताना, प्रारूप यादीत मात्र 'अंगद कांबळे पवन' असा बदल झाला आहे. असाच प्रकार शहरातील जवळपास सर्वच प्रभागांमध्ये झाला असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

या नावांमधील बदलामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची आणि ऐनवेळी मतदानाच्या प्रक्रियेत अडथळे येण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि मतदारांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी, नगर परिषदेने तातडीने या नावांमध्ये दुरुस्ती करून विधानसभेच्या मूळ मतदार यादीनुसार आणि सध्याच्या रेकॉर्डनुसार नावे योग्य प्रकारे प्रकाशित करावीत, अशी नम्र विनंती युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

या निवेदनासोबत विधानसभा मतदार यादीतील नावाचा रेकॉर्ड आणि सध्या प्रदर्शित केलेल्या प्रारूप मतदार यादीतील चुकीच्या नावाचा रेकॉर्ड पुरावा म्हणून जोडण्यात आला आहे. मुख्याधिकारी यांनी  निवेदन स्वीकारले आहे. यामुळे आता नगर परिषद प्रशासन यावर काय कार्यवाही करते, याकडे औसा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या