'ST' आरक्षणासाठी औसा येथे धनगर समाजाचा एल्गार: राष्ट्रीय महामार्ग ठप्प!
औसा (एम बी मणियार): धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी औसा शहरात सोमवारी, दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील 'टी पॉईंट' येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात धनगर समाजाचे शेकडो बांधव सहभागी झाले होते, ज्यामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती.
महाराष्ट्रातील विविध भागांत सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आंदोलनाचा एक भाग म्हणून हे रास्ता रोको आंदोलन औशात करण्यात आले. आंदोलनादरम्यान समाजातील नेत्यांनी आपल्या भाषणातून शासनाला कडक इशारा दिला. "धनगर समाजाला एसटी आरक्षण लवकरात लवकर न मिळाल्यास, भविष्यात संपूर्ण देशभरात यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल," असे नेत्यांनी ठणकावून सांगितले.
'धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या' या मागणीसाठी औसा टी पॉईंटवर रास्ता रोको केल्यानंतर, आंदोलक शांततापूर्ण मार्गाने औसा तहसीलदार यांच्याकडे मागणीचे एक निवेदन सादर केले.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाकडून चक्काजाम आणि रास्ता रोको सारखी आंदोलने विविध ठिकाणी केली जात आहेत, ज्यामुळे आरक्षणाचा हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. औसा येथील या आंदोलनाने शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.




0 टिप्पण्या