-औसा शहरात छोट्या व्यापाऱ्याच्या घराला भीषण आग – लाखो रुपयांचे नुकसान.
औसा प्रतिनिधी
औसा – स्वातंत्र्य दिनाच्या तयारीत व्यस्त असलेल्या औसा शहरातील के. के. नगर परिसरात राहणाऱ्या एका छोट्या व्यापाऱ्याच्या घराला 15 अॉगस्ट च्या दिवशी सकाळी 8 वाजता अचानक आग लागून लाखो रुपयांचे रेडीमेड कपडे व साहित्य जळून खाक झाले. आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
औसा येथील नईमोद्दीन खय्याम जर्दी हे व्यवसायासाठी गावोगावी फिरणारे रेडीमेड कापडाचे छोटे व्यापारी. स्वतंत्र दुकान किंवा गोदाम नसल्याने त्यांनी आपल्या घरातच व्यवसायासाठी लागणारे सर्व कापड साहित्य साठवले होते. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराच्या एका खोलीतून अचानक धुराचे लोट बाहेर येऊ लागले आणि क्षणात घरात आग पसरली.
त्यावेळी संपूर्ण कुटुंब मुलांना शाळेसाठी तयार करत होते. आगीची झळ इतकी जबरदस्त होती की घरातील सर्व वस्तू, व्यवसायाचे कापड साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. शेजाऱ्यांनी व स्थानिक नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
आग विझवल्यानंतर स्थानिक तलाठ्यांना पंचनामा करण्याची विनंती करण्यात आली आहे. घटनास्थळी माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख, भाजपचे माजी शहराध्यक्ष सुनील उटगे, अल्पसंख्याक अध्यक्ष अकरमखां पठाण, शिवकुमार मुरगे, लहु कांबळे,उमर पंजेशा, आदिनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली, व जर्दी कुटुंबियांना शासकीय मदत मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना केली.



0 टिप्पण्या