श्री ओम सिद्धिविनायक मल्टीस्टेट सोसायटीची आर्थिक क्रांती: 104 कोटींचा टप्पा गाठत विकासाला दिली नवी दिशा – श्रीशैल्य उटगे
औसा प्रतिनिधी |
श्री ओम सिद्धिविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आर्थिक स्थैर्याच्या दिशेने भक्कम पावले टाकत, सभासद व ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. सोसायटीचे संस्थापक श्रीशैल्य उटगे यांनी औसा येथे आयोजित विस्तारित कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी हे उद्गार काढले.
सीएनजी पेट्रोल पंपजवळील सुसज्ज नवीन जागेत झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात संदीपान जाधव, शिवदास बनसोडे आणि शरद आप्पा शेटे,अकबर शेख,या ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली.
आपल्या भाषणात श्रीशैल्य उटगे यांनी सांगितले की, "सभासद व ठेवीदारांच्या विश्वासासह, अधिकारी, कर्मचारी व पिग्मी एजंट यांच्या मेहनतीमुळे आज 104 कोटी रुपयांपर्यंत ठेवींचा टप्पा गाठणे शक्य झाले आहे. ही केवळ आर्थिक वृद्धी नसून, एक सामाजिक व व्यावसायिक चळवळ आहे."
ते पुढे म्हणाले, “मल्टीस्टेटच्या माध्यमातून छोट्या व्यवसायिकांना, तसेच महिलांच्या बचत गटातील होतकरू सदस्यांना कर्जपुरवठा करून आजवर 700 महिलांचे प्रभावी संघटन उभारण्यात आले आहे. अर्ध्या तासाच्या आत सोनेतारण कर्ज, शेतमालक कारण कर्ज योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.”
दिपावलीपूर्वी 5 नव्या शाखा सुरु होणार
श्री उटगे यांनी यावेळी सांगितले की, “आगामी दिपावलीपूर्वी अहमदपूर, उदगीर, गंजगोलाई (लातूर), वलांडी येथे पाच नवीन शाखा सुरु करण्याचे नियोजन आहे. या विस्तारामुळे अधिकाधिक नागरिकांपर्यंत सेवा पोहचवता येणार असून, महिलांसाठी स्वतंत्र शाखाही सुरु केली जाणार आहे. त्याचबरोबर तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘नेसरी ग्रुप’ सतत प्रयत्नशील आहे.”
कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमात कार्यकारी संचालक माधव फुलगे यांनी प्रास्ताविक सादर केले. व्हाईस चेअरमन गंगाधर आप्पा हमने, कायदेशीर सल्लागार ऍड. पाटील यांनीही आपले विचार मांडले. व्यासपीठावर जनरल मॅनेजर नागेश मलंग, चेअरमन सत्यम उदगीर, संचालक सौ. प्रियांका लद्दे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखा व्यवस्थापक राजकुमार तोडमारे व त्यांच्या टीमने विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन युवराज हलकुडे यांनी केले.
0 टिप्पण्या