107 सिक्युरिटी गार्डना कामावर घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन – भीम आर्मीचा इशारा

 107 सिक्युरिटी गार्डना कामावर घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन – भीम आर्मीचा इशारा



लातूर प्रतिनिधी :

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथे गेली १२ वर्षे सेवा देणाऱ्या १०७ सिक्युरिटी गार्डना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.


२०१३ पासून हे सर्व गार्ड रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. विशेषतः कोरोना काळात या गार्डनी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. संक्रमित रुग्णांना मदत करणे, मृतदेह उचलणे यासारखी जबाबदारी त्यांनी मोठ्या निष्ठेने पार पाडली.


३१ जुलै रोजी अधीक्षकांनी अचानक एक पत्र काढून या सर्व गार्डना "उद्यापासून कामावर येऊ नये" असा आदेश दिला. या निर्णयामुळे या १०७ कुटुंबांवर उपजीविकेचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यांना २५-३० हजारांचा पगार दिला जाणार आहे, तर हे गार्ड फक्त ९००० रुपयांवर काम करत होते.


या पार्श्वभूमीवर भीम आर्मीचे माजी मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांनी अधीक्षकांना इशारा दिला की, "१०७ गार्डना तात्काळ कामावर परत न घेतल्यास भीम आर्मी तीव्र आंदोलन छेडेल." या वेळी सर्व १०७ गार्ड घटनास्थळी उपस्थित होते.


"सामान्यांचा पैसा वाया घालवून नव्या सुरक्षारक्षकांना भरमसाठ पगार देण्याऐवजी, अनुभवी आणि सेवाभावी गार्डना कामावर परत घ्या," अशी मागणी कोल्हे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या