घरपट्टी व पाणीपट्टी वरील 24% व्याजदंड व अतिरेक कर रद्द करण्याची कॉग्रेसची मागणी.

 घरपट्टी व पाणीपट्टी वरील 24% व्याजदंड व अतिरेक कर रद्द करण्याची कॉग्रेसची मागणी.





औसा (प्रतिनिधी) – औसा शहरातील सामान्य नागरिकांवर अन्यायकारक कर व २४ टक्के व्याजदंडाचा भार टाकल्याच्या विरोधात औसा शहर काँग्रेसने तीव्र आवाज उठवला आहे. घरपट्टी व पाणीपट्टीवर आकारण्यात येणाऱ्या अवाजवी दंड आणि अतिरिक्त कर तत्काळ रद्द करण्यात यावेत, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे.


औसा नगरपरिषद शहरातील गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांकडून नियमबाह्य कर वसुल करत असून, २४% व्याजदंडासारखे 'जुलमी' कर लादले जात आहेत. महाराष्ट्र शासनाने १९६५ च्या नगरपरिषद कायद्यात सुधारणा करून मालमत्ता करावरील दंड माफ करण्यासाठी 'अभय योजना' लागू केली असली, तरी अद्याप या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.


यासंदर्भात नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले असून, मालमत्ता कर वसुली प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना काँग्रेसचे शहराध्यक्ष अजहर हाश्मी, माजी नगराध्यक्ष सय्यद खादर, मुजम्मील शेख, अनीस जहागीरदार, खुंदमीर मुल्ला, अँड. समीयोद्दीन पटेल, वहीद कुरेशी, खाजाभाई शेख, पवन कांबळे, इस्माईल शेख,पुरोषोत्तम नलगे आदी उपस्थित होते.


शहर काँग्रेसने स्पष्ट इशारा दिला आहे की, नागरिकांवरील अन्यायकारक कर हटवले नाहीत, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या