औसा शहराच्या विकासासाठी प्रशासनाला सहकार्य करा – जयश्रीताई उटगे यांचे जनतेला आवाहन..
औसा प्रतिनिधी
औसा, ता. १३ ऑगस्ट – औसा शहरातील वाढत्या लोकसंख्येचा, व्यवसायाचा आणि रहदारीचा विचार करता, रस्त्यांची अतिक्रमणामुळे होणारी संकुचितता ही एक गंभीर समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर जयश्रीताई उटगे यांनी औसावासियांना शांततेचे आणि विकासाचे आवाहन करत एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
"प्रशासन कुणाच्याही विरोधात काम करत नसते. त्यांना नियमाचे बंधन असतात. पण काही लोक प्रशासनाला वेठीस धरण्याचा व दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि अशा गोष्टीमुळे औसा शहराचा विकास , प्रगती थांबली आहे.त्यामुळे कोणाच्याही गैरसमजांना , भूलथापांना,बळी पडू नका. सर्वांसाठी औसा शहराचा विकास महत्त्वाचा आहे," असे जयश्रीताई म्हणाल्या.
त्यांनी स्पष्ट केले की, शहरात अतिक्रमणामुळे रहदारीत अडथळे निर्माण होत आहेत. काही ठिकाणी नागरिकांना स्वतःच्या घरात जाणेही कठीण झाले आहे.
विद्यार्थिनीची छेड, कामगार महिलांना त्रास, ज्येष्ठ नागरिकांना हमरी तुम्ही अशा कंजस्ट रस्त्यावर या गोष्टी सातत्याने होत आहेत.
म्हणून काही अडचणी दूर करून शहराला योग्य दिशा देणे ही सध्या सर्वात मोठी गरज आहे.
"कोणत्याही जाती-धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करणाऱ्यांपासून सावध रहा. मतासाठी जनतेला भुलवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध रहा. जे लोक औसा शहरातच राहत नाहीत, त्यांच्या बोलण्याला बळी पडू नका," असे सांगून जयश्रीताई उटगे यांनी जनतेला सजग राहण्याचे आवाहन केले.
त्या पुढे म्हणाल्या, "औसा शहराचा खरा विकास व्हावा, हेच सर्वांचे स्वप्न आहे. यासाठी सर्व पक्ष, सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र आले पाहिजेत. शासन, मंत्री, खासदार, आमदार यांच्या स्तरावर पाठपुरावा करून आपण औसाचा चेहरा बदलू शकतो."
गेल्या काही दिवसांत व्यापारी, महिला, शाळकरी विद्यार्थिनी आणि अल्पसंख्यांक बांधवांनी त्यांची भेट घेऊन औसा शहराच्या विकासासाठी पाठींबा दर्शवला असल्याचेही जयश्रीताई यांनी सांगितले.
"विकासासाठी थोडी तडजोड आवश्यक असते. चर्चा करून मार्ग निघू शकतो. औसा शहराचा विकास थांबवू नका – नाहीतर पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही," अशी चिंता ही त्यांनी व्यक्त केली.
शेवटी, त्यांनी सर्वसामान्य जनतेला एकच विनंती केली – "औसा शहरासाठी, आपल्या पिढ्यांसाठी, शांततेसाठी आणि प्रगतीसाठी प्रशासनाला सहकार्य करा!"
0 टिप्पण्या