अफसर शेख युवा मंचचा 'खेळ मांडला' आंदोलन घोषित ....

 अफसर शेख युवा मंचचा 'खेळ मांडला' आंदोलन घोषित ....





औसा, प्रतिनिधी:


आमदारांच्या नेतृत्वाखालील  भाजपा प्रणित 

औसा नगरपालिकेच्या मूलभूत गरजांच्या गैरव्यवस्थापन विरोधात  दिनांक 7 जुलै 2025 (सोमवार) रोजी औसा तहसील कार्यालयासमोर ‘खेळ मांडला’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती व मागण्यांचे निवेदन अफसर शेख युवा मंचच्या वतीने औसा तहसीलदारांना देण्यात आले.


आंदोलनामागचे प्रमुख उद्दिष्ट औसा नगरपालिकेच्या कार्यप्रणालीतील हलगर्जीपणाला व नगरविकासात होत असलेल्या अपयशाला वाचा फोडणे हे आहे. या निवेदनाद्वारे शहरातील जनतेच्या मनातील प्रश्नांवर ठोस कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.


औसा शहरातील जनतेच्या मुख्य मागण्या:


सफाई आणि घंटागाडी सेवा पूर्णपणे कोलमडलेली असून ती तातडीने सुरळीत करावी.


शहरातील रस्त्यांवरील दिवे बंद असून रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते, दिवाबत्ती दुरुस्त करावी.


पाणीपुरवठा केवळ 15-20 दिवसांआड होतो, तो नियमितपणे दर 3-4 दिवसांनी केला जावा.


90 लाखांचे विकास काम फक्त 9 लाखांमध्ये उरकले जात असल्याचा आरोप, बोगस विकास कामे त्वरित थांबवावीत.


4 कोटी रुपये खर्चून बांधलेले शौचालय कुलुपबंद, ती नागरिकांसाठी तातडीने खुली करावीत.


प्रचंड वाढलेली मालमत्ता कर (पट्टी) कमी करावा.


औसा MIDC, जुने बसस्थानक, तहसील कार्यालय हे शहराच्या आर्थिक व व्यापारी दृष्टीने महत्त्वाचे असून आमदारांनी त्याबाबतीत घेतलेली भूमिका चुकीची असल्याचा ठपका.



या सर्व मागण्यांवर तत्काळ आणि ठोस पावले उचलली नाहीत, तर 'खेळ मांडला' आंदोलन अधिक व्यापक व तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या निवेदनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे जिल्हाध्यक्ष ,तथा माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख , अफसर शेख युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष जावेद शेख, औसा शहराध्यक्ष अँड. सय्यद मुस्तफा (वकील इनामदार), तसेच शेख मेहराज, युनुस चौधरी, अमर रेड्डी, कृष्णा सावळकर, आनंद धम्मादीप बनसोडे, मुकेश तोवर, प्रदीप कांबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

औसा शहरातील सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे प्रशासनाचे व सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने आता जनतेच्या आवाजाला आंदोलनाच्या माध्यमातून धार दिली जात आहे. ‘खेळ मांडला’ आंदोलन हे केवळ एक प्रतिकात्मक आंदोलन नसून, हे औसातील प्रशासनाच्या अपयशाविरोधातील लोकशक्तीचे प्रतीक ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या