खराब रस्त्यामुळे औशात नागरिक संतप्त; युवक काँग्रेसचा तीव्र आंदोलनाचा इशारा

 खराब रस्त्यामुळे औशात नागरिक संतप्त; युवक काँग्रेसचा तीव्र आंदोलनाचा इशारा


औसा, प्रतिनिधी: 

औसा शहरातील भादा रोड, खादी भांडार ते बौद्ध नगर पूल हा रस्ता अत्यंत खराब झाला असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वारंवार अपघात होत असून नागरिकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी औसा युवक काँग्रेसने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


प्रभाग क्रमांक १ आणि ७ मध्ये येणाऱ्या या रस्त्याची अवस्था फारच वाईट आहे. गुडघ्याइतके खोल खड्डे पडल्याने वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. स्थानिक नागरिक आणि आजूबाजूच्या गावांतून येणाऱ्या लोकांनाही याचा मोठा त्रास होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.


या गंभीर समस्येवर तातडीने लक्ष घालण्याची मागणी औसा भारतीय युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष पवन अंगद कांबळे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या सहायक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. येत्या आठ दिवसांत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास औसा युवक काँग्रेस आणि स्थानिक नागरिक यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

या मागणीसाठी निवेदन देताना युवक काँग्रेसचे पदाधिकारी व परिसरातील युवक उपस्थित होते. प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या