औसा बस स्थानक परिसराला घाणीच्या विळखा
औसा प्रतिनिधी
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य धारण केलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या औसा बस स्थानकाला स्वच्छतेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे औसा बस स्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून घाणीच्या विळख्यात सापडलेल्या बस स्थानकामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. येथील बस स्थानकाच्या प्रवेश दारापासून तसेच बसेस बाहेर निघण्याच्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत बसस्थानकामध्ये येणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस खडखड करीत आदळ आपट करीत बाहेर पडतात शहरातील जुन्या बसस्थानकामध्ये प्रवाशांना पुरेसा निवारा नाही तसेच बसस्थानक परिसरामध्ये सतत घाण साचलेले असते प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तसेच महिला व प्रवासाच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे खिसे कापण्याचे व महिलांचे दागिने लंपास करण्याचे प्रकार घडत आहेत. औसा पंचायत समिती पासून लातूर वेस हनुमान मंदिरापर्यंत रस्त्याच्या उजव्या बाजूस ग्रामीण रुग्णालयातून पाणी सोडले जात असल्याने या पाण्यामुळे रस्त्यावर घाण होत आहे येणाऱ्या जाणाऱ्या माणसाच्या अंगावर वाहनाचे शिंतोडे उडत आहेत. येथील ग्रामीण रुग्णालयाच्या जागेमध्ये 100 कोटी रुपये खर्च करून 100 खाटाचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले असून या उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने उपजिल्हा रुग्णालयासाठीच्या उभारणीसाठी पाया खोदल्यानंतर त्यातील पाणी रस्त्यावर सोडून दिल्यामुळे या परिसरातील नागरिकांना अतोनात त्रास होत आहे तसेच मिनी शॉपिंग सेंटर मधील उजव्या बाजूच्या व्यवसायिकांना व ग्राहकांना रस्त्यावर सतत सोडले जाणाऱ्या पाण्याचा आणि घाणीचा त्रास होत आहे. बस स्थानकामध्ये नव्याने बांधण्यात आलेले शौचालय सुरू करणे महत्त्वाचे आहे. शौचालयाचे उद्घाटन होऊनही शौचालयाचा वापर सुरू न केल्यामुळे आणि जुन्या शौचालयामध्ये घाण असल्यामुळे नागरिक उघड्यावर लघु शंका करीत असल्याने महिला प्रवासी वर्गांची कुचंबना होत आहे. औसा आगार प्रमुखांनी या कामी लक्ष घालून बस स्थानकाचा परिसर स्वच्छ ठेवणे व बस स्थानकाच्या प्रवेशदारातील व बसेस बाहेर पडण्याच्या मार्गातील खड्डे तात्काळ बुजवून घ्यावेत अशी मागणी प्रवासी जनतेतून होत आहे.
0 टिप्पण्या