स्व. अरविंद पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
लातूर (प्रतिनिधी) – सामाजिक बांधिलकी हीच खरी श्रद्धांजली असते, या उदात्त हेतूने स्व. अरविंद पाटील साहेब यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त मोफत सर्वरोग निदान महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी हक्क कृती समिती, महाराष्ट्र राज्य, शिवसेना डॉक्टर सेल, महाराष्ट्र राज्य आणि यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर सोमवार, दिनांक 31 मार्च 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत श्री नकुलेश्वर देवस्थान, बोरगाव(नं) - नाव्होली, ता. औसा, जि. लातूर येथे संपन्न होणार आहे.
स्व. अरविंद पाटील साहेब यांनी आयुष्यभर सामाजिक न्यायासाठी संघर्ष केला. गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी आणि वंचित वर्गाच्या न्यायहक्कांसाठी ते कायम लढत राहिले. त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी आणि गरजू रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आजही ग्रामीण भागातील अनेक नागरिक योग्य वैद्यकीय उपचारांपासून वंचित आहेत. हीच बाब लक्षात घेऊन, तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत संपूर्णपणे मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार उपलब्ध करून देण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे.
या शिबिरात हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, मेंदू व मणक्याचे विकार, स्त्रियांशी संबंधित आजार, दंतविकार, नेत्ररोग, हाडांचे विकार, थायरॉईड, मिरगी (फिट्स), स्मरणशक्ती कमी होणे, तसेच मेंदूमध्ये गाठ होणे यासारख्या गंभीर आजारांवर तपासणी आणि तज्ज्ञांचा सल्ला दिला जाणार आहे. उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय, उदगीर यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणीही केली जाणार आहे.
या शिबिरासाठी डॉ. नितीन बरडे – मेंदू व मणका विकार व शल्यचिकित्सा तज्ज्ञ, डॉ. धनंजय पडवळ – हृदयरोग, मधुमेह व अतिदक्षता तज्ज्ञ (प्रदेशप्रमुख, डॉक्टर सेल, महाराष्ट्र राज्य), डॉ. विक्रम सूर्यवंशी – अस्थिरोग तज्ज्ञ, डॉ. हनुमानदास चांडक – अस्थिरोग तज्ज्ञ, डॉ. बजरंग खडबडे – दंत विकार तज्ज्ञ, डॉ. योगेश फेरे – जनरल फिजिशियन, डॉ. अक्षय भांबरे – जनरल फिजिशियन, डॉ. सखु सूर्यवंशी – जनरल फिजिशियन व स्त्रीरोग तज्ज्ञ, डॉ. स्वाती गोमारे – जनरल फिजिशियन व स्त्रीरोग तज्ज्ञ, डॉ. ओजेश लोंढे – जनरल फिजिशियन, डॉ. सुरज माळी – जनरल फिजिशियन व बालरोग तज्ज्ञ, डॉ. सुमित भोरकर – जनरल फिजिशियन हे आणि अन्य अनेक नामवंत तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, आवश्यक शस्त्रक्रियांसाठी डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचाराची व्यवस्था केली जाईल.
गरजू आणि गरीब रुग्णांसाठी ही आरोग्यसेवेची सुवर्णसंधी आहे. आरोग्यसेवा ही केवळ सुविधा नसून ती प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे, या विश्वासाने हे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ज्या रुग्णांना तपासणीची किंवा उपचारांची गरज आहे, त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, व नावनोंदणीसाठी 9527032595 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन या शिबिराचे प्रमुख आयोजक चेतन अरविंद पाटील यांनी केले आहे.
0 टिप्पण्या