*लातूर ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार रमेशआप्पा कराड यांचे रामेश्वर या जन्मभूमीत ग्रामस्थांकडून उत्साहात स्वागत
*
अटीतटीच्या झालेल्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केलेले भाजपाचे नेते नवनिर्वाचित आमदार मा. रमेशआप्पा कराड यांचे जन्मभूमी असलेल्या लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर (रुई) येथे गावकऱ्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात स्वागत केले.
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर निकालाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी पहिल्यांदाच मा. रमेशआप्पा कराड यांनी रामेश्वर गावातील विविध देवदेवतांचे दर्शन घेण्यासाठी आले असता आपल्या गावचा नेता प्रदीर्घ संघर्षानंतर आमदार म्हणून विजयी झाल्याने त्यांचा भाजपा कार्यकर्त्यांसह समस्त गावकऱ्यांनी फटाक्याची आतिषबाजी आणि विविध वाजंत्रीसह मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले. ठिकठिकाणी लाडक्या बहिणींनी आ रमेशआप्पा कराड यांचे औक्षण करून विजयाची पताका फडकिल्याबद्दल अभिनंदन केले.
यावेळी लातूर ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार रमेशआप्पा कराड आणि सौ संजीवनीताई कराड यांनी रामेश्वर नगरीतील प्रभू श्रीराम मंदिर आणि संत गोपाळबुवा महाराज यांच्या मंदिरात जाऊन आरती केली व मनोभावे दर्शन घेतले. त्याचबरोबर राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड आणि त्यागमूर्ती प्रयागआक्का कराड यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. रामेश्वर येथील निवासस्थानी माजी सरपंच ज्येष्ठ मार्गदर्शक तुळशीराम अण्णा कराड, प्रगतशील शेतकरी काशीरामनाना कराड यांचे आ रमेशआप्पा कराड यांनी आशीर्वाद घेतले. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांनी केलेल्या सत्कार बद्दल आभार व्यक्त करून श्रीप्रभूराम मंदिरात बोलताना नवनिर्वाचित आमदार रमेशआप्पा कराड यांनी मी आमदार व्हावे यासाठी गेल्या वीस वर्षापासून मतदार संघातील असंख्य सर्वसामान्य कार्यकर्त्याबरोबरच ग्रामस्थांनीही परिश्रम घेतले, संघर्ष केला. या संघर्षाला आज प्रत्यक्षात यश आले. माझा विजय हा कार्यकर्त्यांच्या कष्टाचा मेहनतीचा असून विजयासाठी लाडक्या बहिणींनी मला भरभरून आशीर्वाद दिले आहेत. आता सर्वांचीच मोठी जबाबदारी वाढली आहे आपल्याला आपला मतदारसंघ विकास कामाच्या माध्यमातून एक मॉडेल मतदारसंघ निर्माण करावयाचा आहे असे बोलून दाखविले.
0 टिप्पण्या