डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या उमेदवारीने युतीमध्ये धडकी
लातूर प्रतिनिधी
लातूर लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लातूर लोकसभा राखीव मतदार संघातून काँग्रेस पक्षाने लातूर येथील सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी घोषित करून अचंबित केले आहे. लातूर शहर, लातूर ग्रामीण निलंगा, अहमदपूर, उदगीर आणि लोहा, कंधार या सहा विधानसभा मतदारसंघाचा मिळून लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. राखीव झाल्यानंतर प्रथमच जयवंतराव आवळे यांनी काँग्रेस पक्षातर्फे विजय मिळवला होता तर 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर सुनील गायकवाड आणि 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांनी विजय संपादन केला होता. लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे डॉक्टर शिवाजी काळगे यांना महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यासह इतर पक्षाच्या आघाडीचे समर्थन डॉक्टर शिवाजी काळगे यांना मिळणार आहे. लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे असून उदगीर आणि अहमदपूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहेत. निलंगा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे आमदार असून नांदेड जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस मधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे अशोकराव चव्हाण विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांचे प्रचार लोहा मतदारसंघात पणाला लागणार आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश आप्पा कराड, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील यांची प्रतिष्ठा महाएपिसोडच्या उमेदवाराकरिता पणाला लागणार आहे. काँग्रेस पक्षाचे लातूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यासाठी माजी मंत्री अमित देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख, शिवसेनेचे माजी आमदार तथा लातूर जिल्हाप्रमुख दिनकरराव माने, माजी आमदार त्रिंबक नाना भिसे, माजी आमदार वैजनाथ दादा शिंदे, डॉ आशाताई भिसे, बबनराव भोसले यांची प्रतिष्ठा काँग्रेस उमेदवारासाठी पणाला लागणार आहेत. पारंपारिक पद्धतीने हा मतदार संघ काँग्रेस पक्षाकडे असताना 2004 ते 2014 आणि 2019 च्या निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे गेला असून यावेळी हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे खेचून आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली असून महायुतीचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना डॉक्टर शिवाजी काळगे यांचे आव्हान पेलावे लागणार आहे. अत्यंत शांत संयमी व वैद्यकीय क्षेत्रामध्ये नावलौकिक कमावलेले डॉक्टर शिवाजी काळगे हे चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरत असून त्यांच्या विजयासाठी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेसह इतर मित्र पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते प्रामाणिकपणे काम केल्यास शिवाजी काळगे हे चमत्कार घडवू शकतील काय अशी चर्चा सुरू आहे.
0 टिप्पण्या