भादा रोडवरील अतिक्रमण निघाल्याने रस्त्याने घेतला मोकळा श्वास
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील लातूर वेस हनुमान मंदिरापासून भादा, मुरुड जाणाऱ्या रस्त्यावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते तसेच फेरीवाले, हातगाडे, भाजीविक्रेते आणि भुसार मालाचा व्यापार करणाऱ्या व्यवसायिकांनी रस्त्यावर दुकाने मांडल्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची सातत्याने कोंडी होत होती. लातूर वेस हनुमान मंदिरापासून स्वामी रामानंद तीर्थ पुतळ्यापर्यंत तर एक वाहन आले की दुसरे वाहन या रस्त्यावरून जाणे कठीण होऊन बसले होते. रहदारीला सतत होणारा अडथळा, वाहन चालकाचे डोकेदुखी बनला होता. या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी अनेक वेळा मागणी करूनही अतिक्रमण हटवण्याची मोहीम अनेक दिवसांपासून रखडली होती. अखेर सार्वजनिक बांधकामाच्या औसा उपविभागाने दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी या रस्त्यावर बुलडोझर फिरवीत अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. अतिक्रमण काढण्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक 2 डिसेंबर रोजी या रस्त्यावरील पूर्ण अतिक्रमण हटवण्यात आल्याने भादा रोड ने मोकळा श्वास घेतला. सार्वजनिक बांधकाम उपविभाग औसा मार्फत या परिसरातील व्यापारी व नागरिकांना लेखी सूचना दिल्या होत्या परंतु नागरिक व व्यापारी अतिक्रमण काढण्यास तयार नव्हते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभागाला पोलीस प्रशासन आणि नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेऊन हे अतिक्रमण काढावे लागले. अतिक्रमण काढल्यामुळे अनेकांचे व्यवसाय बंद झाले तर काही नागरिकांची रहात असलेली घरेही या अतिक्रमणामध्ये काढण्यात आल्याने व्यापारी व नागरिक विस्थापित झाले आहेत.
0 टिप्पण्या