अलीम करपुडे यांच्या घरापासून चौधरी यांच्या घरापर्यंत नवीन पाइपलाइनची मागणी; आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
औसा प्रतिनिधी
औसा, दि. २ : शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधिल अलीम करपुडे यांच्या घरापासून चौधरी यांच्या घरापर्यंतच्या परिसरात मागील १० ते १२ वर्षांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असून, नगर परिषद प्रशासनाने तातडीने मॅन्युअली चर खोदून नवीन पाइपलाइन टाकून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात मुख्याधिकारी, नगर परिषद औसा यांना निवेदन देण्यात आले आहे. परिसरातील रस्ते अरुंद असल्याने टँकर अथवा लहान वाहनाद्वारेही पाणीपुरवठा करणे शक्य होत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे.
सदर प्रश्नाबाबत परिसरातील नागरिक तसेच भाजपच्या वतीने यापूर्वी अनेक वेळा तोंडी व लेखी स्वरूपात सूचना आणि निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. प्रत्येक वेळी गुत्तेदार उपलब्ध नसणे, मजूर मिळत नसणे आदी कारणे सांगून प्रश्न प्रलंबित ठेवला जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन मॅन्युअली चर खोदून नवीन पाइपलाइन टाकावी व पाणीपुरवठा सुरळीत करावा, तसेच संबंधित नळधारकांची मागील दहा वर्षांची नळपट्टी माफ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उमर पंजेशा यांनी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


0 टिप्पण्या