सेवापूर्ती सोहळ्यात आठवणींना उजाळा;निजाम सरांच्या कार्याचा गौरव

 सेवापूर्ती सोहळ्यात आठवणींना उजाळा;निजाम सरांच्या कार्याचा गौरव 




औसा प्रतिनिधी :

शिस्त, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि संस्थेच्या विकासासाठी आयुष्यभर केलेल्या समर्पित कार्याचा गौरव करत हिंदुस्थानी एज्युकेशन सोसायटी, औसा संचलित एन. बी. एस. अजीम कॉलेजचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा. श्री. शेख एन. आय. (निजाम सर) यांच्या सेवापूर्ती निमित्त भावपूर्ण गौरव सोहळा अजीम कॉलेज, औसा येथे उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला.


शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत शिस्त, प्रामाणिकपणा आणि समर्पणाच्या भावनेतून निजाम सरांनी बजावलेल्या प्रदीर्घ सेवेला यावेळी मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व सहकाऱ्यांनी मनापासून सलाम केला. त्यांच्या कार्यकाळातील संस्थेच्या विकासातील योगदानाचा गौरव करत उपस्थितांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


यावेळी मान्यवरांच्या हस्ते निजाम सरांचा सत्कार करण्यात आला. सत्कार स्वीकारताना निजाम सर भावुक झाले. आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देताना सहकारी, विद्यार्थी आणि संस्थेशी असलेल्या ऋणानुबंधामुळे वातावरण काही काळ भावुक झाले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. डॉ. अफसर शेख, प्रभारी नगराध्यक्ष, नगर परिषद औसा, हे होते. यावेळी मंचावर सौ. परवीन (बाजी) नवाबोदीन शेख, लोकनियुक्त नगराध्यक्ष, नगर परिषद औसा, तसेच मा. श्री. सुलेमान (राजे) अफसर शेख, विद्यार्थी ग्राम जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, लातूर, उपस्थित होते.


याशिवाय सौ. गजाला (बाजी) अफसर शेख, पर्यवेक्षक श्री. खलील सिद्धीकी सर, मेटे सर, केसरे सर, मुख्याध्यापिका यास्मिन मॅडम, अजीम कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. दानिश शेख सर यांच्यासह संस्थेतील शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.


निजाम सरांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या शिस्तप्रिय व कर्तव्यनिष्ठ कार्यपद्धतीचे कौतुक केले. ‘संस्थेच्या प्रगतीत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला निरोप देताना आनंद आणि हुरहूर अशा दोन्ही भावना मनात आहेत,’ अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या