किशन कन्स्ट्रक्शनमध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरे
ब्रह्मकुमारी बहिणींच्या उपस्थितीत व्यसनमुक्ती व आत्मशांतीचा संदेश
औसा प्रतिनिधी :
औसा शहरातील भूमिपुत्र संजीव फुलमाळी आणि सत्यवान ऊर्फ पप्पू फुलमाळी यांनी सुरू केलेल्या नवी मुंबई येथील किशन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या सानपाडा येथील कार्यालयात रक्षाबंधनाचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. आदर्श शिक्षक किशनराव फुलमाळी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रजापिता ईश्वरीय ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या ब्रह्मकुमारी महेश्वरी व ब्रह्मकुमारी शुभांगी बहनजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राजयोग शिक्षण केंद्राच्या माध्यमातून धावपळीच्या जीवनात मनःशांती मिळविण्यासोबतच कौटुंबिक जीवन आनंदी व सुखमय कसे करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ब्रह्मकुमारी संस्थेच्या माध्यमातून देश-विदेशात सुरू असलेल्या आध्यात्मिक व सामाजिक कार्याची माहिती देत, नैराश्याच्या अवस्थेत सापडलेल्या अनेकांना आत्मशांती व सुखाचा मार्ग मिळत असल्याचे सांगण्यात आले.
व्यसनमुक्तीचा संदेश देताना प्रत्येकाने व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या नशामुक्ती अभियानाचा संदर्भ देत समाजातील युवकांसह प्रत्येकाने व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने उपस्थितांना राखी बांधून प्रेम, बंधुभाव, सद्भावना आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमास शिवराम वाकळे, कुदळे साहेब, सौ. राणीताई फुलमाळी, किशन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नूतन व्यवस्थापक तृप्तीताई यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आध्यात्मिकता, सामाजिक बांधिलकी आणि व्यसनमुक्तीचा संदेश देणारा हा रक्षाबंधन सोहळा उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संस्मरणीय ठरला.

0 टिप्पण्या