कन्याशाळा स्वतंत्र ठेवा; दान दिलेल्या जागेतच इमारत बांधा भादा ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्र्यांना निवेदन; सुमारे ५०० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या

 कन्याशाळा स्वतंत्र ठेवा; दान दिलेल्या जागेतच इमारत बांधा


भादा ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्र्यांना निवेदन; सुमारे ५०० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या



औसा प्रतिनिधी 

भादा (ता. औसा) : कन्या प्रशाला भादा स्वतंत्र ठेवून, ग्रामस्थांनी शाळेसाठी दान दिलेल्या जागेतच मंजूर निधीतून नवीन इमारत बांधण्यात यावी, अशी जोरदार मागणी भादेकर शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत सुमारे ५०० ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.


भादा येथील कन्या प्रशाला सुमारे २५ वर्षांपूर्वी तत्कालीन भादा जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या प्रयत्नातून औसा येथून भादा येथे स्थलांतरित झाली. मुलींना शिक्षणाची स्वतंत्र सुविधा मिळावी, या उद्देशाने ग्रामस्थांनी २०१६ पासून स्वतंत्र इमारतीसाठी प्रयत्न सुरू केले. ‘मुलगी शिकली तर घर शहाणे होते’ या भावनेतून ग्रामस्थ व स्थानिक पुढाऱ्यांच्या सहकार्याने २०१७ मध्ये गावाच्या मध्यवर्ती भागात कन्याशाळेसाठी जागा दान देण्यात आली.


त्यानंतर इमारत बांधकामासाठी सातत्याने निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडेही याबाबत प्रस्ताव व मागणी करण्यात आली होती. मात्र कोविड कालावधी आणि त्यानंतर शासन बदलल्यामुळे निधीचा प्रश्न प्रलंबित राहिला. अपुरा निधी मिळाल्यास बांधकाम पूर्ण होणे शक्य नसल्यानेही कामाला विलंब झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.


दरम्यान, शासनाच्या एकत्रीकरणाच्या निर्णयानुसार सुमारे वर्षभरापूर्वी कन्या प्रशाला एकत्रित करण्याचे पत्र प्राप्त झाल्यानंतर ग्रामस्थांनी ३० मे २०२५ रोजी विशेष ठराव करून त्यास विरोध केला. शाळा व्यवस्थापन व पालकांनीही या निर्णयाला विरोध दर्शविला. तसेच १३ ऑगस्ट रोजी भादा येथे झालेल्या जनता दरबारातही याबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांनी ‘एकत्रीकरण होणार नाही, निश्चिंत रहा,’ असे आश्वासन दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.


ऑगस्ट २०२६ च्या सुरुवातीला पुन्हा एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी १२ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष ग्रामसभा घेऊन एकत्रीकरणास विरोध करणारा ठराव मंजूर केला. हा ठराव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे.


दरम्यान, मंजूर निधीचा वापर करण्याच्या नावाखाली सध्या वापरात असलेली व सुस्थितीत असलेली शाळेची इमारत पाडून त्याच जागेवर नवीन इमारत उभारण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. या प्रक्रियेत ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन आणि ग्रामपंचायतीला विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे.


ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या


कन्या प्रशाला स्वतंत्र ठेवून तिच्यासाठी मंजूर झालेला निधी ग्रामस्थांनी दान दिलेल्या जागेवरच नवीन इमारत बांधण्यासाठी वापरण्यात यावा. सुस्थितीत असलेली शाळेची इमारत नियमबाह्य पद्धतीने पाडली असल्यास संबंधितांची चौकशी करून दोषींवर शासकीय कारवाई व आवश्यक तो गुन्हा दाखल करावा. तसेच सुरू असलेले बांधकाम अथवा पाडकाम तात्काळ थांबवावे, अशी मागणी भादेकर शिक्षणप्रेमी नागरिकांनी केली आहे.


“ग्रामस्थांनी मुलींच्या शिक्षणासाठी जागा दान दिली आहे. त्यामुळे मंजूर निधीचा वापर त्याच जागेवर स्वतंत्र कन्याशाळेची इमारत उभारण्यासाठी व्हावा. सुस्थितीत असलेली इमारत पाडून निधी खर्च करण्यास आमचा ठाम विरोध आहे,” अशी भूमिका ग्रामस्थांनी निवेदनातून मांडली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या