लातूर पॅटर्नवर डाग : NEET घोटाळ्यानंतर विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लोकसत्ता युवा संघटना आक्रमक.

 लातूर पॅटर्नवर डाग : NEET घोटाळ्यानंतर विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लोकसत्ता युवा संघटना आक्रमक.




 NEET पुनर्परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांसाठी मोफत सुविधा द्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा





---


लातूर | प्रतिनिधी


NEET-UG 2026 परीक्षा पेपर लीक प्रकरणामुळे विद्यार्थ्यांवर निर्माण झालेला मानसिक व आर्थिक ताण लक्षात घेता, २१ जून रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी मोफत निवास व भोजन व्यवस्था करावी, तसेच खाजगी कोचिंग क्लासेसना मोफत मार्गदर्शन देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी लोकसत्ता युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इलाही बशीरसाब शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


३ मे २०२६ रोजी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) मार्फत घेण्यात आलेल्या NEET-UG परीक्षेचा पेपर लीक झाल्याचे उघड झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) चौकशीत या प्रकरणाचे धागेदोरे लातूरमधील काही खाजगी कोचिंग संस्थांपर्यंत पोहोचल्याची चर्चा असून, त्यामुळे लातूरच्या “लातूर पॅटर्न” प्रतिमेलाही धक्का बसला आहे.


या पार्श्वभूमीवर NTA ने २१ जून २०२६ रोजी पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे राज्यभरातून लातूरमध्ये आलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे राहणीमान, हॉस्टेल, मेस व इतर खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अनेक गरीब, शेतकरी व मध्यमवर्गीय कुटुंबांवरील आर्थिक ताण लक्षात घेऊन शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


लोकसत्ता युवा संघटनेच्या निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत —


• पुनर्परीक्षेपर्यंत गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत निवास व भोजन व्यवस्था करावी.

• खाजगी क्लासेसनी कोणतीही अतिरिक्त फी न घेता Revision Classes, Doubt Solving आणि Mock Tests उपलब्ध करून द्यावेत.

• पुनर्परीक्षेदरम्यान सर्व परीक्षा केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त व पारदर्शक व्यवस्था ठेवावी.

• पेपर लीक प्रकरणात दोषी आढळणाऱ्या संस्था, संचालक व मध्यस्थांवर कठोर कायदेशीर कारवाई करून परवाने रद्द करावेत.


“विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नसताना त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा इलाही बशीरसाब शेख यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या