औसा बाजार समिती मराठवाड्यात दुसऱ्या, तर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर नेणार: आ. अभिमन्यू पवार

 औसा बाजार समिती मराठवाड्यात दुसऱ्या, तर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर नेणार: आ. अभिमन्यू पवार





*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाचे भव्य भूमिपूजन संपन्न; साखर कारखान्यांच्या माध्यमातून सहकार बळकट करण्याचा निर्धार


औसा (प्रतिनिधी)


"शेतकरी हाच विकासाचा केंद्रबिंदू असून, त्यांना अधिक सुविधा, सन्मान आणि आर्थिक बळ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पारदर्शक कारभारामुळे औसा कृषी उत्पन्न बाजार समितीने मराठवाड्यात आपला ठसा उमटवला असून, आता या समितीला लातूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर नेण्याचा आमचा संकल्प आहे," असे प्रतिपादन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले.

औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात उभारण्यात येणाऱ्या **‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’** आणि इतर सुविधा इमारतींच्या बांधकामाचे भूमिपूजन व शिलान्यास समारंभ आ. पवार यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.


बाजार समितीच्या प्रगतीचा आलेख मांडताना आ. पवार म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी या समितीकडे केवळ ५ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. मात्र, विश्वासार्ह व्यवस्थापन आणि शेतकरी हिताच्या निर्णयांमुळे आज ही ठेव १७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मराठवाड्यातील अग्रगण्य बाजार समिती म्हणून औसा बाजार समितीची नवी ओळख निर्माण झाली आहे.


ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकरी बांधवांना विश्रांती आणि जेवणाची सोय व्हावी यासाठी 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन' मैलाचा दगड ठरेल. केवळ सुविधाच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी सोयाबीन आणि हरभरा प्रक्रिया केंद्र उभारण्याचे नियोजन सुरू असून, यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

सहकार क्षेत्र सक्षम करण्यावर भर देताना आ. पवार यांनी सांगितले की, बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्यासाठी राज्य शासनाकडून १०९ कोटी रुपयांची मदत मिळवून दिली आहे. तसेच, अनेक वर्षांपासून बंद असलेला श्री निळकंठेश्वर किल्लारी सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


या कार्यक्रमास माजी आमदार दिनकरराव माने, पंचायत समिती सभापती गंगाबाई कोदळीकर, भाजप जिल्हा सरचिटणीस सुभाष जाधव, बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती भिमाशंकर राचट्टे, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. परिक्षीत पवार, मारुती महाराज कारखान्याचे संचालक रमेश वळके, सहाय्यक निबंधक रमेश सगर यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच प्रकाश काकडे, चंद्रकला झिरमिरे, प्रवीण कोपरकर, युवराज बिराजदार, संतोषी वीर, विकास नरहरे, ईश्वर कुलकर्णी, राधाकृष्ण जाधव, गोविंद भोसले, समितीचे सचिव संतोष हुच्चे यांच्यासह संचालक मंडळ, व्यापारी, हमाल बांधव आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या