रमजान निमित्त औसा शहरात स्वच्छता आणि मूलभूत सुविधा पुरवण्याची एम.आय.एम.ची मागणी

 रमजान निमित्त औसा शहरात स्वच्छता आणि मूलभूत सुविधा पुरवण्याची एम.आय.एम.ची मागणी


मुख्याधिकाऱ्यांना निवेदन; स्ट्रीट लाईट, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेवर भर देण्याची विनंती


औसा (प्रतिनिधी):

पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, औसा शहरातील सर्व प्रार्थनास्थळांच्या परिसरातील स्वच्छता, बंद असलेले पथदिवे सुरू करणे आणि पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याबाबत एम.आय.एम. च्या वतीने नगर परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

एम.आय.एम.चे औसा  प्रमुख सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १८ फेब्रुवारीपासून रमजानचा महिना सुरू होत आहे. या काळात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने प्रार्थनास्थळांमध्ये (मशिदींमध्ये) प्रार्थनेसाठी येतात. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी खालील प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या आहेत:

  शहरातील सर्व मशिदींसमोर आणि विशेषतः ईदगाह परिसरात दररोज स्वच्छता करण्यात यावी. तसेच सकाळी आणि संध्याकाळी इफ्तारनंतर घंटागाडीद्वारे कचरा संकलनाचे नियोजन करावे.

  शहरातील प्रमुख रस्ते आणि गल्ल्यांमधील बंद असलेले पथदिवे तातडीने दुरुस्त करून सुरू करावेत, जेणेकरून रात्रीच्या वेळी नागरिकांना त्रास होणार नाही.

  रमजानमध्ये पहाटे 'सहरी' आणि सकाळी नमाज झाल्यानंतर नागरिक विश्रांती घेत असतात. हे लक्षात घेता, सकाळी ९ ते ११ या वेळेत पाणी सोडण्यात यावे आणि किमान आठवड्यातून दोनदा पाणीपुरवठा निश्चित करावा.

  शहराच्या जुन्या भागासह नवीन विस्तारित हद्दीतील रस्त्यांचीही साफसफाई करण्यात यावी.

प्रशासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून येत्या काळात येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी विनंतीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या